News Flash

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या २८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीचे शनिवारी शंख फुंकण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाबुराव चांदोरे, भाई जगताप, गजानन कीर्तिकर या राजकीय

| April 21, 2013 02:08 am

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या २८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीचे शनिवारी शंख फुंकण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाबुराव चांदोरे, भाई जगताप, गजानन कीर्तिकर या राजकीय पटलावरील व्यक्तींसह मोहन भावसार, रमेश देवाडीकर, किशोर पाटील, मदन पाटील, मीनानाथ धानजी यांच्यासह अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचप्रमाणे शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशीच मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे माजी प्रमुख कार्यवाह मीनानाथ धानजी यांनी सरकार्यवाहपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्याग करणारे अजित पवार हेसुद्धा या निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याकडून पवार यांच्यासह अर्जुनवीर शांताराम जाधव आणि बाबुराव चांदोरे हे प्रतिनिधी मतदार असणार आहेत. याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मीनानाथ धानजी यांच्या पाठीशी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन खंबीरपणे उभे राहिले आहे. त्यामुळेच कोल्हापूरच्या प्रतिनिधित्वासह धानजी यांनी सरकार्यवाहपदासाठी पहिलाच उमेदवारी अर्ज भरून रंगत आणली आहे.
कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या कारकिर्दीत राज्य संघटनेचे संयुक्त  कार्यवाहपद भूषविणाऱ्या धानजी यांनी संघटकाचा शिवछत्रपती पुरस्कारही प्राप्त केला आहे. धानजी यांच्या उमेदवारी अर्जामुळे आता सत्तासंघर्षांची समीकरणे काय रंग दाखवतील, याची कबड्डी क्षेत्रात जोरदार चर्चा आहे.
शनिवारी दुपारी जिल्हानिहाय (प्रत्येक जिल्ह्याचे तीन प्रतिनिधी) मतदारांची अंतिम यादी शिवाजी पार्क येथील महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने प्रसिद्ध केली. राज्यातील २४ जिल्ह्यांचे ७२ प्रतिनिधी २८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा अर्ज बजावणार आहेत. यापैकी सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रतिनिधींच्या मतदानाबाबत धोरण ठरेल. याचप्रमाणे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे असल्याचे समजते.
निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र                  २० ते २३ एप्रिल
नामनिर्देशित पत्रांची छाननी                   २४ एप्रिल (दु. ४ वाजेपर्यंत)
उमेदवारी नामनिर्देशन मागे घेणे               २४ एप्रिल (रा. ८ वाजेपर्यंत)
वैध उमेदवारांची चिन्हांसहित यादी           २५ एप्रिल (सं. ६ वा.)
मतदानाची तारीख                             २८ एप्रिल  (स. ११ ते दु. १ वाजेपर्यंत)
मतमोजणी व निकाल                         २८ एप्रिल (दु. ३ वा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 2:08 am

Web Title: election preparation of maharashtra state kabaddi association
टॅग : Kabaddi,Sports
Next Stories
1 पुण्याकडून एअरइंडियाचा धुव्वा
2 हैदराबादी विजय!
3 अस्सल झुंज!
Just Now!
X