राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक २५ नोव्हेंबरला

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची बहुचर्चित पंचवार्षिक निवडणूक २५ नोव्हेंबरला होणार असून, १० दिवसांवर येऊन ठेपलेल्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पध्रेच्या कालखंडात प्रमुख संघटकांच्या मोर्चेबांधणीच्या चढाया-पकडींचा खेळ मैदानाबाहेर रंगणार आहे. त्यामुळे सिन्नरला मैदानावरील सामन्यांपेक्षा ‘राज्य अजिंक्यपद कबड्डी निवडणूक निवड चाचणी’ स्पर्धा अधिक रंगतदार होणार असल्याचे कबड्डीवर्तुळात म्हटले जात आहे.

सहा महिन्यांपूर्वी राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक होणार होती. मात्र घटनादुरुस्तीचा पेच उद्भवल्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करून रद्द ठरवण्याची नामुष्की राज्य संघटनेवर ओढवली होती. शिवाजी पार्क येथील संघटनेच्या कार्यालयात ११ ऑक्टोबरला झालेल्या शासकीय सभेत निवडणुकीच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्य संघटनेला संलग्न असलेल्या प्रत्येक जिल्ह्य़ांतील तीन नामनिर्देशित मतदारांना निवडणूक लढवण्याचे आणि मतदान करण्याचे अधिकार असतील. या निवडणूक प्रक्रियेद्वारे एकूण १६ जणांची कार्यकारिणीवर निवड होणार आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपासून ४ नोव्हेंबपर्यंत सिन्नरला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. परंतु या निमित्ताने विविध जिल्ह्य़ांमधील संघटक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गटातटांच्या योजना आखण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जिल्हानिहाय मतदारांची नावे पाठवण्याची मुदत ३० ऑक्टोबपर्यंत असून, ३१ ऑक्टोबरला अंतिम यादी जाहीर होणार आहे. १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. मग १६ नोव्हेंबरला वैध उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे. १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान उमेदवार अर्ज माघारी घेऊ  शकतात, तर २५ नोव्हेंबरला सकाळी मतदान होऊन त्याच दिवशी दुपापर्यंत निकाल जाहीर करण्यात येतील.

१६ पदांसाठी निवडणूक

राज्य संघटना सुधारित घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबवणार असून, यात अध्यक्ष, उपाध्यक्ष (६ पदे), कार्याध्यक्ष, सरकार्यवाह, खजिनदार, सहकार्यवाह (६ पदे) अशा एकंदर १६ पदांचा नव्या घटनेत समावेश आहे. याशिवाय अन्य सात स्वीकृत सदस्यांचा कार्यकारिणी समितीवर समावेश असेल. पदाधिकारी पदावर स्थान न मिळालेल्या जिल्ह्य़ांच्या प्रतिनिधींसाठी पाच, आजीव सदस्य प्रतिनिधीसाठी एक आणि विद्यापीठ/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय महिला कबड्डीपटूसाठी एक अशा या जागा भरण्याचा अधिकार अध्यक्षांना राहील.

महिलांसाठी एकंदर चार पदे राखीव

नव्या घटनेत प्रत्येकी सहा उपाध्यक्ष आणि सहसचिवांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी प्रत्येकी दोन उपाध्यक्ष आणि सहसचिवांची पदे म्हणजेच एकंदर चार पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या पदांसाठी जिल्हा प्रतिनिधींमधून एकाही महिला प्रतिनिधीने नामनिर्देशन न भरल्याने ते पद रिकामे राहत असेल, तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू त्या पदासाठी थेट नामनिर्देशन भरू शकतात. त्यांना जिल्हा प्रतिनिधी असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.