ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिस पेरीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि १०० बळी घेणारी एलिस पेरी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. रविवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात एलिस पेरीने या विक्रमाला गवसणी घातली. एलिस पेरीने आपल्या संघाची कर्णधार मेग लेनिंगच्या साथीने भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून इंग्लंडवर मात केली.

एलिस पेरीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषकादरम्यान इंग्लंडच्या नॅट स्किवरचा बळी घेत, स्वतःच्या १०० व्या बळीची नोंद केली होती. रविवारीच्या सामन्यात एलिस पेरीने ४७ धावांची खेळी करत एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. या खेळीसाठी एलिस पेरीला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी सध्या १४१६ धावा आणि ९८ बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन १४७१ धावा आणि ८८ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.