17 January 2021

News Flash

क्रिकेट सम्राज्ञी! – एलिस पेरी

महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या दशकभरापासून निर्विवाद साम्राज्य गाजवणारी एकमेव क्रिकेटपटू म्हणजे ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी.

|| ऋषिकेश बामणे

दशकातून एखादाच असा क्रिकेटपटू घडतो, ज्याचा खेळ पाहताना आपण टीव्हीसमोर तळ ठोकून बसतो. जितकी त्या खेळाडूची फलंदाजी आपल्या डोळ्यांचे पारणे फेडणारी असते, तितकीच मातबर फलंदाजांना धडकी भरवणारी त्याची वेगवान गोलंदाजीही आपल्या शरीरावर शहारा आणते. त्यातच जर हा खेळाडू क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांमध्येही पारंगत असला, तर त्याची कीर्ती आपोआपच सगळीकडे पसरते. आतापर्यंत निश्चितच तुमच्या मनात अशाप्रकारे अष्टपैलू भूमिका बजावणाऱ्या एखाद्या पुरुष क्रिकेटपटूचे चित्र तयार झाले असेल. परंतु हीच विचारधारणा मोडीत काढून महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या दशकभरापासून निर्विवाद साम्राज्य गाजवणारी एकमेव क्रिकेटपटू म्हणजे ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी.

करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर क्रीडा क्षेत्रासह जवळपास सर्वासाठीच निराशाजनक ठरलेल्या २०२० या वर्षांवर ३० वर्षीय पेरीने स्वत:ची मोहोर उमटवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) नुकताच देण्यात आलेल्या २०११ ते २०२० या दशकातील सवरेत्कृष्ट महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर पेरीने नाव कोरले. मुख्य म्हणजे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणूनही पेरीचीच निवड करण्यात आली. त्यामुळे उजव्या हाताने फलंदाजी तसेच गोलंदाजी करणाऱ्या पेरीविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये वाढली आहे.

सिडनीतील वाहरुंगा प्रांतात ३ नोव्हेंबर, १९९० रोजी जन्मलेल्या पेरीला बालपणापासूनच विविध क्रीडा प्रकारांची आवड. वडील मार्क त्यावेळी व्यवसाय करण्याबरोबरच पेरीला क्रिकेटचे प्रशिक्षणही द्यायचे. त्यामुळे पेरीला किशोरवयात घरातल्यांचा खंबीर पाठिंबा मिळाला. न्यू साऊथ वेल्स येथील बीक्रॉफ्ट पब्लिक स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेणारी पेरी त्यावेळी शाळेच्या क्रिकेट संघाची कर्णधार होती. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिस हिली आणि पेरी या दोघींची येथूनच घट्ट मैत्री झाली. त्याशिवाय फुटबॉल, गोल्फ, टेनिस आणि अ‍ॅथलेटिक्स या खेळांमध्येही तिने शालेय पातळीपासूनच निपुणता मिळवली. पॅम्बेले या महिलांच्या महाविद्यालयातून १२वीचे शिक्षण घेताना पेरीने प्रामुख्याने क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांवर लक्ष केंद्रित केले. महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचीही पेरीच कर्णधार होती.

वयाच्या १६व्या वर्षी पेरीने प्रथमच ऑस्ट्रेलिया महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये न्यू साऊथ वेल्स संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत छाप पाडल्यामुळे तिला थेट ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाची संधी मिळाली. २२ जुलै २००७ रोजी न्यूझीलंडविरुद्ध तिने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला सामना खेळताना ऑस्ट्रेलियाची सर्वात युवा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. तर पुढील १२ दिवसांतच ४ ऑगस्टला तिने हाँगकाँगविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल संघाकडूनही पदार्पण केले. २००९च्या ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आणि २०११च्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारी पेरी अद्यापही एकमेव खेळाडू आहे. तिच्या नावावर तीन आंतरराष्ट्रीय गोलही जमा आहेत.
कालांतराने या दोन्ही खेळांचा ताळमेळ साधणे अशक्य झाल्याने पेरीने क्रिकेटला प्राधान्य दिले. २०१०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पेरीच्या कर्तृत्वाची पहिली झलक चाहत्यांना पाहण्यास मिळाली. कारकीर्दीच्या सुरुवातीला गोलंदाज म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पेरीने मग हळूहळू फलंदाजीवरही अधिक भर दिला. २०११च्या दशकाला प्रारंभ झाल्यावर पेरीची गणना महिला क्रिकेटमधील नामांकित खेळाडूंमध्ये होऊ लागली. मात्र जितक्या कौशल्यतेने ती खेळते, तितक्याच दुखापतींनीही तिला सातत्याने भेडसावले आहे. गुडघ्यावर आणि डाव्या हातावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तिला मध्यंतरी सहा-सात महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.

पेरीच्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाने तब्बल सहा विश्वचषक जिंकले आहेत. यामध्ये २०१३चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० या पाच वर्षांतील ट्वेन्टी-२० विश्वचषकांचाही समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध २०१७मध्ये झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत पेरीने कसोटी क्रिकेटपटू म्हणूनही आपले नाणे खणखणीत वाजवले. एकीकडे संघातील एकही फलंदाज अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरत असताना पेरीने साकारलेले द्विशतक आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. अखेरीस २०१७मध्ये प्रथमच पेरीला ‘आयसीसी’ने वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवले.

ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅकग्रा आणि बेलिंडा क्लार्क यांना आदर्श मानणाऱ्या पेरीने सामाजिक बांधिलकी जपताना कर्करोगग्रस्तांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. गतवर्षी ऑस्ट्रेलियात वणव्यामुळे नुकसान झालेल्यांसाठी खेळवण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्यातही पेरी खेळली होती. बिग बॅश लीगदरम्यान षटकारासाठी टोलवलेला चेंडू चाहत्याच्या चेहऱ्यावर आदळल्याने पेरीने स्वत: त्याचा वैद्यकीय खर्च केल्याचेही समजते. एकंदर ऑस्ट्रेलियन परंपरेनुसार शाब्दिक चकमकीत सहभागी न होता आपल्या कामगिरीने क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या पेरीने आतापर्यंत मैदानाबाहेरही स्वत:ची वेगळी ओळख जपल्यामुळेच जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात तिचे खास स्थान निर्माण झाले आहे.

लेखनातही पेरीचे कौशल्य

क्रिकेट, फुटबॉल खेळांत स्वत:चे कौशल्य सिद्ध करणाऱ्या पेरीला लेखनाचीही आवड आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये वाढदिवसाच्या दिवशी पेरीचे ‘परस्पेक्टिव्ह’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. त्याशिवाय लहान मुलांना विशेषत: मुलींना उद्देशून २०१५ ते २०१७दरम्यान तिने चार भागांत विभागलेल्या पुस्तकांच्या मालिकेचे लेखन केले. या चारही पुस्तकांना विदेशातील युवा फळीकडून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभला.

rushikesh.bamne@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 1:04 am

Web Title: ellyse perry mppg 94
Next Stories
1 IND vs AUS: रोहित शर्मासह पाच भारतीय क्रिकेटपटू आयसोलेशनमध्ये, कारण…
2 ‘स्टेन’गन थंडावली; यंदा आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय
3 सौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका; रूग्णालयात दाखल
Just Now!
X