आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची वेगळी ओळख निर्माण करुन देणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीने आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसीची सर्वाधिक विजेतेपद पटकावली. धोनीच्या निवृत्तीची बातमी समोर आल्यानंतर सर्व स्तरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही धोनीच्या निवृत्तीवर एका पर्वाची अखेस अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“माझ्या दृष्टीने भारतीय क्रिकेटमधील एका पर्वाची ही अखेर आहे. भारतीय आणि जागतिक क्रिकेटमध्ये धोनीच योगदान मोठं आहे. त्याच्या नेतृत्वगुणांशी स्पर्धा करणं सोपं नव्हतं. सुरुवातीच्या कारकिर्दीत धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी सर्व चाहते आतूर असायचे. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा कधी ना कधी शेवट हा असतोच. यष्टीरक्षणातही त्याने स्वतःचा एक वेगळा दर्जा निर्माण केला होता. त्याच्या कारकिर्दीत साध्य करण्यासाठी काहीही बाकी राहिलेलं नाही. त्याच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा”, अशा आशयाचा संदेश लिहीत गांगुलीने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

याव्यतिरीक्त ICC ने ही त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचं कौतुक केलं आहे.

अनेक चाहत्यांना धोनी आगामी टी-२० विश्वचषकात सहभागी होईल अशी आशा होती. परंतू त्याआधीच धोनीने निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.