मुंबई इंडियन्सकडून निव्वळ धावगतीआधारे पराभूत झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक राहुल द्रविड अतिशय निराश झाला होता. या रोमहर्षक लढतीत आमचे गोलंदाज योजनापूर्वक गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले, असे द्रविडने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
‘‘सामन्याचा निकाल मनासारखा न लागल्याने निराश होणे स्वाभाविक आहे. परंतु याचे श्रेय मुंबई इंडियन्सला द्यायला हवे. त्यांनी अप्रतिम फलंदाजी केली. १४.३ षटकांत १९० धावांचे लक्ष्य त्यांच्यापुढे होते. परंतु १४.४ षटकांत त्यांनी १९५ धावा उभारल्या. ही असामान्य गोष्ट आहे. खेळपट्टी चांगली होती, परंतु आम्हाला गोलंदाजीच्या योजना योग्य पद्धतीने राबवता आल्या नाहीत,’’ असे द्रविडने सांगितले.
रविवारी रात्री झालेल्या या सामन्यात धावसंख्या समान झाल्यावर जेम्स फॉल्कनरच्या १५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आदित्य तरेने स्क्वेअर लेगला षटकार खेचून मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘‘सामन्यातील एका क्षणी आम्ही जिंकू अशी खात्री निर्माण झाली होती. परंतु पुढच्याच चेंडूवर मुंबईच्या फलंदाजाने चौकार मारला आणि क्षणार्धात आमच्या गोटात नैराश्य पसरले. या भावना शब्दांत मांडणे कठीण होते. धावसंख्येची बरोबरी झाली, तेव्हा पुन्हा आमच्या संघाचा आनंद द्विगुणित झाला. परंतु पुढच्याच चेंडूला पुन्हा पारडे प्रतिस्पध्र्याच्या बाजूला झुकले,’’ अशा शब्दांत द्रविडने या सामन्याचे वर्णन केले.
‘‘भावभावना आणि नाटय़ यांनी युक्त असा हा माझ्या आयुष्यातील एक सर्वोत्तम सामना होता. फक्त निकाल प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने लागला, त्यामुळे मी निराश झालो,’’ असे तो पुढे म्हणाला.