ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथला शनिवारी तिसऱ्या शतकाने हुलकावणी दिली. अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी स्मिथ फलंदाजी करत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेच्या जवळ लागला. त्यामुळे स्मिथला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. आर्चरचा 148kmph वेगाने आलेला बाऊंसर स्मिथच्या मानेवर आदळल्यामुळे तो मैदानावर कोसळला. काही क्षणांसाठी मैदानावर शांतता पसरली होती. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनीही स्मिथकडे धाव घेतली. स्मिथला किरकोळ दुखापत झाली होती. काही काळासाठी त्याला मैदानही सोडावं लागले. मात्र, स्मिथला चेंडू लागल्यानंतर काहीवेळासाठी स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला होता.


८० धावांवर असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेवर आदळल्यामुळे स्मिथला जायबंदी होऊन माघारी परतावे लागले होते. आर्चरचा खतरनाक बाऊंसर स्मिथच्या हेल्मेटच्या उजव्या बाजूला मानेच्या जवळ लागला. त्यामुळे स्मिथ वेदनेने मैदानावरच कोसळला. त्यानंतर दोन्ही संघाच्या वैद्यकीय टीम मैदानावर आल्या. पण अखेर स्मिथला रिटायर्ड हर्ट होऊन परत ड्रेसिंग रुममध्ये परतावे लागले. तो परत जात असताना मैदानावरील प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत स्मिथच्या फलंदाजीचे कौतुक केले.

मात्र सिडल (९) बाद झाल्यावर स्मिथ जिद्दीने पुन्हा मैदानात उतरला. लागोपाठ दोन चौकार लगावत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. पण वोक्सच्या आत घुसणाऱ्या चेंडूवर स्मिथने खेळण्याचा प्रयत्नच केला नाही व तो पायचीत झाला. १६१ चेंडूंत १४ चौकारांनिशी ९२ धावा करून स्मिथ माघारी परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २५० धावांवर संपुष्टात आला.