लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हेडिंग्ले मैदानावर भारतीय संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरला. पण इंग्लंडने लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढत भारताचा पहिला डाव ४०.४ षटकात ७८ धावांवर संपुष्टात आणला आहे. तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.  प्रत्युत्तरात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी शतकी भागीदारी रचली आहे. या दोघांनी ३२व्या षटकात भारताच्या ७८ धावांचा आकडा पार केला. त्यानंतर दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ४२ षटकात बिनबाद १२० धावा केल्या असून त्यांच्याकडे आता ४२ धावांची आघाडी आहे. बर्न्स ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५२ आणि हमीद ११ चौकारांसह नाबाद ६० धावांवर नाबाद आहे.

भारताचा पहिला डाव

लोकेश राहुल  आणि रोहित शर्मा यांंनी भारताच्या डावाची सुरुवात केली. लॉ़र्ड्स कसोटीत सामनावीर ठरलेला लोकेश राहुल या डावात शून्यावर माघारी परतला, तर त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजाराही एका धावेवर बाद झाला. या दोघांना इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने यष्टीरक्षक जोस बटलकरवी झेलबाद केले. त्यानंतर अँडरसनने भारताला अजून एक तडाखा दिला. त्याने कर्णधार विराट कोहलीला अवघ्या ७ धावांवर तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिक्य रहाणे यांच्याकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. पण संघाचे अर्धशतक फलकावर लावल्यानंतर ओली रॉबिन्सनने रहाणेला (१८)  बाद केले. लंचपर्यंत भारताची २५.५ षटकात ४ बाद ५६ धावा  अशी अवस्था झाली.

लंचनंतरही इंग्लंडने आपला तिखट मारा सुरूच ठेवला. ओली रॉबिन्सनने ऋषभ पंतला वैयक्तिक २ धावांवर बाद केले. त्यानंतर सामन्यात संधी मिळालेल्या क्रेग ओव्हर्टनने सलामीवीर रोहित शर्मा (१९) आणि मोहम्मद शमीला (०) बाद करत भारताला अजून संकटात टाकले.  क्रेग ओव्हर्टननेच ४१व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला रूटकरवी झेलबाद करत भारताचा डाव ७८ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडकडून अँडरसन आणि ओव्हर्टन यांना प्रत्येकी तीन, तर रॉबिन्सन आणि करनला प्रत्येकी दोन बळी घेता आले.

 

भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतल्याने इंग्लंडवर दडपण आहे. हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असेल. दुसरीकडे भारताने हा सामना जिंकल्यास ३५ वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला २-० ने पराभूत केले होते. विराटने मागील सामन्यातील संघ या कसोटीतही कायम राखला आहे.

हेडिंग्ले हे नेहमीच क्रिकेटपटूंसाठी एक वास्तविक कसोटी घेणारे मैदान राहिले आहे. येथे बचावात्मक खेळाला फारसा वाव नाही. गेल्या २० वर्षांची आकडेवारी या वस्तुस्थितीची साक्ष आहे. या दरम्यान, हेडिंग्ले येथे झालेल्या १८ पैकी १७ कसोटी सामन्यांचा निकाल लागला आहे. २०२१मध्ये फक्त एक कसोटी अनिर्णित राहिली.

 

वेगवान चौकडीच कायम

हेडिंग्लेमधील वातावरण हे थंड असल्यामुळे वेगवान गोलंदाजांचेच खेळपट्टीवर वर्चस्व दिसून येईल. या परिस्थितीत भारताने वेगवान चौकडीचीच रणनीती आखून, पुन्हा रवीचंद्रन अश्विनला विश्रांती दिली आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हे गोलंदाज आपल्या मागील सामन्यातील कामगिरी पुन्हा करण्यास उत्सुक आहेत. तर इंग्लंडने डेव्हिड मलान आणि आणि क्रेग आव्हर्टनला संधी दिली आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा,  जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, के. एल. राहुल.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, हसीब हमीद, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन.