भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील मेसेज व्हायरल झाले आहेत. मँचेस्टर कसोटीच्या काही वेळाआधी भारतीय खेळाडूंना व्हॉट्सअॅपवर विविध मेसेज मिळत होते.

टीम इंडियाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवलेले दोन मेसेज समोर आले आहेत. हे दोन्ही मेसेज टॉसच्या थोड्या वेळापूर्वी पाठवले गेले. पहिला मेसेज होता, ज्यात खेळाडूंना सामना रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. यासोबतच आपापल्या खोलीत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. आतापर्यंत सर्व काही ठीक आणि स्पष्ट होते. परंतु १० मिनिटांनंतर ग्रुपमध्ये दुसरा मेसेज येताच, तो मँचेस्टरमधील गैरव्यवस्थेचे दर्शन घडवणारा होता.

हेही वाचा – इंग्लंडमध्ये असलेला रवींद्र जडेजा सापडला संकटात, बायको आणि बहिणीत झाला ‘मोठा’ वाद!

१० मिनिटांत आला दुसरा मेसेज

दुसऱ्या मेसेजमध्ये टीम इंडियाला सांगण्यात आले, की आम्ही तुमच्यासाठी खोलीत नाश्त्याची व्यवस्था करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जावे लागेल. हा संदेश करोनाच्या सावलीत राहणाऱ्या खेळाडूंना आश्चर्यचकित करणार आहे. हे त्यांच्यासाठी धक्कादायक आहे. एकीकडे त्यांना खोलीत राहण्यास सांगितले जाते आणि दुसरीकडे त्यांना त्याच खोलीतून नाश्त्यासाठी बाहेर येण्यास सांगितले गेले.

करोनामुळे, टीम इंडियाचा जवळजवळ संपूर्ण सपोर्ट स्टाफ अलग ठेवण्यात आला आहे. भारतीय खेळाडूंची देखील करोना चाचणी करण्यात आली. सध्या स्थगित केलेली मँचेस्टर कसोटी आगामी काळात आखण्याची भारत आणि इंग्लंड क्रिकेट मंडळांची योजना आहे.