ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने दमदार प्रत्युत्तर दिले आहे. पहिला डाव १९१ धावांवर आटोपल्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात चहापानापर्यंत ३४६ धावांची आघाडी घेतली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी दमदार सलामी दिल्यानंतर शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंत यांनी इंग्लंडला चांगलेच थकवले. शार्दुलने आपले सलग दुसरे अर्धशतक साकारले. त्याने आक्रमक अंदाजात फलंदाजी करत ७२ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा चोपल्या.

मुंबईकर क्रिकेटपटू शार्दुलने आपल्या खेळीत दमदार फटके खेळले. जेम्स अँडरसनसारख्या गोलंदाजाला शार्दुलने स्ट्रेट ड्राईव्हसारखे फटके खेळत डोळ्यांची पारणे फेडली. शार्दुलच्या दमदार फलंदाजीनंतर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी मुंबईच्या गोलंदाजांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ”मुंबईचे गोलंदाज फलंदाजी करताना आपली विकेट फेकत नाहीत, त्यांची विकेट घ्यावी लागते. त्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण घेताना फलंदाजीचेही धडे द्यावे लागतात. गोलंदाज म्हणून तुम्हाला सहज विकेट्स मिळणार नाही, त्यामुळे आपणही आपली विकेट सहज टाकायची नसते”, असे गावसकरांनी सांगितले.

हेही वाचा – ENG vs IND : ‘‘आई-बापासाठी तरी..”, खराब फॉर्मशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेला सेहवागचा सल्ला

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने जेव्हा प्रतिस्पर्धी संघाला ३४० पेक्षा जास्त धावांचे लक्ष दिले, तेव्हा भारताने कोणताही सामना गमावलेला नाही. त्यामुळे ओव्हल कसोटीतही भारताला विजय मिळण्याची चिन्हे दिसत आहे. या कसोटीचा अजून एक दिवस बाकी असून इंग्लंडचा संघ इतिहास रचणार की सामना गमावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.