Eng vs Ind Test : बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर ३१ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या चौथ्या दिवशीच हा सामना संपला. हा सामना अत्यंत रंगतदार झाला. १९४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १६२ धावांवर आटोपला. इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात विराट कोहलीने झुंजार अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पांड्यानेही काही काळ खिंड लढवली. पण अखेर भारताच्या पदरी निराशा आली. बेन स्टोक्सने ४, अँडरसन आणि ब्रॉडने २-२, तर कुरान आणि रशीदने १-१ बळी टिपला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सॅम कुरानला सामनावीर घोषित करण्यात आले.

आता उद्यापासून भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या दरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली याने आपल्या कर्णधार पदाबाबत एक विधान केले आहे. आज विराटने पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ‘कर्णधार म्हणून माझ्याकडून जे काही सर्वोत्तम शक्य असेल, ते मी करत आहे’, असे विराट कोहली याने स्पष्ट केले.

‘मी सांघाचे नेतृत्व करतो. ती जबाबदारी सांभाळताना मी माझ्याकडून जे सर्वोत्तम प्रयत्न करणे शक्य असते, ते प्रयत्न करत असतो. कर्णधारपद भूषवण्याबाबत प्रत्येकाची मते आणि पद्धत वेगळी असते. पण माझ्या संघातील प्रत्येक खेळाडूशी माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. आमच्यात चर्चा आणि संवाद कायम सुरु असतात. एखाद्या कर्णधाराने कशा पद्धतीचा विचार करायला हवा, तसा विचार सध्या मी करत आहे आणि हेच उत्तम कर्णधाराचे लक्षण असते’, असे विराट म्हणाला.

याशिवाय, भारतीय संघाचा कर्णधार म्हणून खेळताना मला खूप अभिमान वाटतो, अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.