इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज अ‍ॅलेक्स व्हार्फ यांनी आज इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत हेडिंग्ले मैदानावर अंपायर म्हणून कसोटी पदार्पण केले आहे. व्हार्फ यांनी २००४मध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये त्यांना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

व्हार्फ यांनी १३ एकदिवसीय सामन्यात १८ बळी घेतले आहेत. जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान ते चौथे सामनाधिकारी होते. व्हार्फ एक वनडे आणि तीन टी-२० सामन्यांमध्ये टीव्ही अंपायरही राहिले आहेत.

 

हेही वाचा – भारतात ‘तालिबान’ची क्रिकेट टीम? ‘या’ राज्यातील स्पर्धेत घेतला सहभाग!

व्हार्फ यांनी भारताच्या तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडला यांना त्यांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बाद केले होते आणि तो सामना इंग्लंडने सात गडी राखून जिंकला होता.

लंचपर्यंत भारत

हेडिंग्ले मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला आहे. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांंनी भारताच्या डावाची सुरुवात केली. लॉ़र्ड्स कसोटीत सामनावीर ठरलेला लोकेश राहुल या डावात शून्यावर माघारी परतला, तर त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजाराही एका धावेवर बाद झाला. या दोघांना इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने यष्टीरक्षक जोस बटलकरवी झेलबाद केले. त्यानंतर अँडरसनने भारताला अजून एक तडाखा दिला. त्याने कर्णधार विराट कोहलीला अवघ्या ७ धावांवर तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिक्य रहाणे यांच्याकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. पण संघाचे अर्धशतक फलकावर लावल्यानंतर ओली रॉबिन्सनने रहाणेला बाद केले. लंचपर्यंत भारताची २५.५ षटकात ४ बाद ५६ धावा अशी अवस्था झाली आहे.