भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपली निराशाजनक कामगिरी सुरू ठेवली आहे. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. ख्रिस वोक्सने त्याला पायचित पकडले. वोक्सने प्रथम जडेजाला बाद केले. त्याच षटकात वोक्सने रहाणेविरोधात जोरदार पायचितचे अपील केले आणि पंचांनी त्याला बाद घोषित केले. यानंतर, रहाणेने डीआरएस घेतला, ज्यामध्ये चेंडू यष्टीच्या वरून जाताना दिसला. यामुळे रहाणेला मोठे जीवन मिळाले. मात्र, रहाणेला या संधीचा फायदा घेता आला नाही आणि पुढच्याच षटकात वोक्सने त्याला पायचित पकडले.

अजिंक्यच्या सततच्या अपयशानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याला महत्तवाचा सल्ला दिला आहे. सेहवाग म्हणाला, ”आपले आई-बाप आपल्याला खेळताना पाहत असतात, त्यांच्यासाठी तरी आपण मैदानावर असणे महत्त्वाचे आहे. धावा जमल्या नसतील तरी चालतील पण त्यांच्यासाठी एक-दोन तास खेळपट्टीवर उभे राहता आले पाहिजे. मनातून सर्व विचार सोडून फक्त मैदानात उभे राहण्याचा विचार केला तरी धावा होतील.”

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्यने ओव्हल कसोटीत निराश केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीड़ियावर अजिंक्यला ट्रोल करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

हेही वाचा – ENG vs IND : ओव्हल कसोटीत बाद झाल्यावर निराश झाला विराट; ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच त्यानं आपला हात…

अजिंक्य रहाणे या मालिकेच्या ७ डावांमध्ये फक्त १०९ धावा (५, १, ६१, १८, १०, १४, ०) करू शकला आहे. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने ६१ धावा केल्या. तेव्हापासून त्याला मालिकेत मोठी धावसंख्या करता आली नाही. यामुळे त्याच्या कसोटी सरासरीवरही परिणाम झाला आहे. रहाणेची फलंदाजीची सरासरी २०१५च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून (५९ कसोटी) ४०च्या खाली पोहोचली आहे. इंग्लंड दौऱ्यावर अनेक वेळा टीम इंडियाला मधल्या फळीत त्याच्यामुळे फटका सहन करावा लागला आहे..