ICC Men’s Cricket World Cup Super League स्पर्धेत पहिल्याच मालिकेत यजमान इंग्लंडने बाजी मारली. साऊदॅम्पटनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचं आव्हान ४ गडी राखत परतवून लावलं. याचसोबत ३ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. विजयासाठी दिलेलं २१३ धावांचं आव्हान पार करताना इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने धडाकेबाज ८२ धावांची खेळी केली. याच खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

आयर्लंडविरूद्धच्या या सामन्यात इंग्लंडकडून दोन खेळाडूंची कामगिरी विशेष ठरली. जॉनी बेअरस्टोने दमदार ८२ धावा केल्या. अवघ्या ४१ चेंडूत त्याने ही खेळी केली. त्याने १४ चौकार आणि २ षटकार ठोकले. या सामन्यात बेअरस्टोने ३००० धावांचा टप्पा गाठला. यासाठी त्याने ७२ डावांत ही कामगिरी केली. वन डे क्रिकेटमध्ये ३००० धावांचा टप्पा सर्वात जलद गाठणाऱ्या जो रूटच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.

याच सामन्यात गोलंदाजीत फिरकीपटू आदिल रशीदने दमदार कामगिरी केली. त्याने १० षटकात ३४ धावा देत ३ महत्त्वाचे बळी मिळवले. याचसोबत त्याने वन डे क्रिकेटमध्ये १५० बळींचा टप्पा गाठला. इंग्लंडकडून वन डेमध्ये १५० बळी मिळवणारा आदिल रशीद पहिलावहिला फिरकीपटू ठरला. याआधीच्या फिरकीपटूंना ही किमया साधता आली नव्हती.

दरम्यान, आयर्लंडने दुसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करत २१२ धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ४ गडी राखून सामना खिशात घातला. तसेच ICC च्या वर्ल्ड कप लीग स्पर्धेत पहिल्या मालिका विजयाची नोंदही केली.