इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. कसोटी मालिकेत १-० ने बाजी मारल्यानंतर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला होता. मँचेस्टरच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इमाद वासिमने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला.

यानंतर टॉम बँटन आणि इतर फलंदाजांच्या साथीने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी बँटन आणि मलान यांच्यात महत्वपूर्ण भागीदारी झाली. ४२ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने बँटनने ७१ धावांची खेळी केली. मात्र बँटन माघारी परतल्यानंतर इंग्लंडच्या डावाला गळती लागली. १६.१ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात इंग्लंडच्या संघाने १३१ धावांपर्यंत मजल मारली.

यानंतर मैदानात पावसाचं आगमन झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला. बराच काळ पावसाची संततधार सुरु असल्यामुळे खूप वेळ वाया गेला. अखेरीस पावसाने उसंत घेतल्यानंतर पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली. परंतू मैदान खेळण्यायोग्य नसल्याचं समजताच दोन्ही पंचांनी कर्णधारांच्या अनुमतीने पहिला टी-२० सामना रद्द झाल्याची घोषणा केली. पाकिस्तानकडून इमाद वासिम आणि शादाब खान यांनी प्रत्येकी २-२ तर इफ्तिकार अहमदने १ बळी घेतला. इंग्लंडचा एक फलंदाज धावबाद झाला.