घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत पराभवाची चव चाखायला लावणाऱ्या इंग्लंडला पहिल्या कसोटीत पाकिस्तानने कडवी झुंज दिली आहे. मँचेस्टरच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने सलामीवीर शान मसूदच्या धडाकेबाज दीड शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारली. मसूदला पहिल्या डावात बाबर आझम आणि शादाब खान यांनी चांगली साथ दिली.

शान मसूदने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत एक बाजू लावून धरली. ३१९ चेंडूंचा सामना करताना शानने १८ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १५६ धावा केल्या. या शतकी खेळाच्या जोरावर शान मसूदने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. तब्बल २४ वर्षांनी इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात शतक झळकावणारा मसूद पहिला पाकिस्तानी सलामीवीर फलंदाज ठरला आहे. १९९६ साली सईद अन्वरने सलामीला येताना १७६ धावांची खेळी केली होती.

बाबर आझमनेही ६९ तर शादाब खानने ४५ धावा करत मसूदला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी ३-३, ख्रिस वोक्सने २ तर अँडरसन आणि बेस यांनी १-१ बळी घेतला.