इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील साऊथॅम्प्टनचा दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सामन्यात चार दिवस सलग पाऊस पडला. पाचव्या दिवशी मैदान ओले झाल्यामुळे दोन सत्रानंतर खेळ सुरू झाला. पहिल्या डावात पाकिस्तानने २३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने सामना अनिर्णित होण्यापूर्वी चार गडी गमावून ११० धावा केल्या. जॅक क्रॉलीने अर्धशतक झळकावले, तर पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बासने दोन विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ५ बाद १२६ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आला. दुसऱ्या दिवशी खेळ पावसाने थांबण्याआधी पाकिस्तानने ९ बाद २३३ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. चौथ्या दिवशी पाकिस्तानचा डाव २३६ धावांत संपला. मोहम्मद रिझवानने दमदार ७२ धावा केल्या.

चौथ्या दिवशी ५ षटकात इंग्लंड १ बाद ७ धावांवर असताना पुन्हा पावसामुळे खेळ थांबला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाने पाठलाग सोडला नाही. पहिली दोन सत्र वाया गेल्यावर शेवटच्या सत्रात काही काळ खेळ झाला. सुमारे ३८ (एकूण ४३) षटकांच्या खेळात इंग्लंडने ४ बाद ११० धावा केल्या. जॅक क्रॉलीने ५३ धावा केल्या. पण सामनावीराचा किताब रिझवानला देण्यात आला.