इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पाकिस्तानवर आलेली २-० पराभवाची नामुष्की टळली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे पहिली दोन सत्र वाया गेली. अखेरच्या सत्रात काही षटकांचा खेळ झाला, ज्यात जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा ओलांडला. परंतू अखेरच्या सत्रात निकाल लागणं अशक्य असल्याचं लक्षात येताच दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यात धन्यता मानली. या मालिकेतला दुसरा आणि तिसरा कसोटी सामना पावसामुळे वाया गेला. परंतू पहिल्या कसोटी सामन्यातील विजयाच्या जोरावर इंग्लंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी बाजी मारली. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून फलंदाजीत झॅक क्रॉलीचं द्विशतक, जोस बटलरचं शतक तर गोलंदाजीत जेम्स अँडरसनने आपला ठसा उमटवला.

अवश्य वाचा – जेम्स अँडरसनचा धडाका, कसोटी क्रिकेटमध्ये गाठला ६०० बळींचा टप्पा

झॅक क्रॉली आणि जोस बटलर यांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ८ गड्यांच्या मोबदल्यात ५८३ धावांपर्यंत मजल मारली. क्रॉलीने ३४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २६७ तर बटलरने १३ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने १५२ धावा केल्या. त्यांना ख्रिस वोक्सनेही चांगली साथ दिली. इंग्लंडच्या या त्रिकुटाने पाकिस्तानी गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. पहिल्या डावात डोंगराएवढं आव्हान उभं केल्यानंतर इंग्लंडने आपला डाव घोषित केला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात शाहीन आफ्रिदी, यासिर शहा आणि फवाद आलम यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. मात्र इंग्लंडच्या धावगतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम त्यांना जमलं नाही.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानीच पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. कर्णधार अझर अलीचं शतक आणि मधल्या फळीत मोहम्मद रिझवानने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या इतर फलंदाजांनी पहिल्या डावात सपशेल निराशा केली. अझर अलीने एकाकी किल्ला लढवत २१ चौकारांसह नाबाद १४१ धावांची खेळी केली. जेम्स अँडरसनने पहिल्या डावात ५ बळी घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं. पहिल्या डावात पाकिस्तानला २७३ धावांवर गारद करुन इंग्लंडने पाकिस्तानला फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावात पाकिस्तानने सावध सुरुवात केली. तरीही चौथ्या दिवसाच्या अखेरीस पाकिस्तानने २ बळी गमावले होते. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. अखेरच्या दिवसात इंग्लंडला विजयासाठी ८ बळींची गरज होती. परंतू साऊदम्पटनच्या मैदानावर दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे पहिल्या दोन सत्रांचा खेळ वाया गेला. तिसऱ्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने आपला ६०० बळींचा टप्पा पूर्ण केला. कर्णधार जो रुटने असाद शफीकला बाद करत इंग्लंडला चौथं यश दिलं. मात्र यानंतर दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यात धन्यता मानली. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ ४ गड्यांच्या मोबदल्यात १८७ धावांपर्यंत मजल मारु शकला.