पाकिस्तानच्या संघाने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना पाच धावांनी जिंकला आणि मालिका १-१ अशी बरोबरी सोडवली. हैदर अली आणि अनुभवी मोहम्मद हाफीज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकने १९० धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अलीने दिलेली एकाकी झुंज तोकडी पडली आणि यजमानांना पराभवाचा सामना करावा लागला.

सलग दोन अर्धशतके ठोकणाऱ्या मोहम्मद हाफीजला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले. मोहम्मद हाफीजने टी२० कारकिर्दीत दुसऱ्यांदा अर्धशतकी खेळीची हॅटट्रिक केली. २०१२-१२मध्येदेखील सलग तीन टी२० अर्धशतके झळकावली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. गेलनेदेखील आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या वेळी अर्धशतकांची हॅटट्रिक केली होती. या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील हे दोघे ३ हॅटट्रिक्ससह अव्वल आहेत.

असा रंगला सामना

पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९० धावा कुटल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा हैदर अली याने ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. हाफीजने नाबाद राहत ५२ चेंडूत ८६ धावा कुटल्या. त्यात ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. इंग्लंडला मिळालेल्या १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्या खेळाडूंना मोठी भागीदारी करता आली नाही. मोईन अलीने १९व्या षटकापर्यंत झुंज दिली. पण अखेर तो ६१ धावांवर बाद झाला. त्यामुळे इंग्लंडला १८५ धावांपर्यंतच मजल मारता आली.