करोनानंतर झालेल्या बहुचर्चित अशा पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता झाली. कसोटी मालिका १-०ने गमावल्यानंतर अखेर पाकिस्तानचा दौऱ्याचा शेवट गोड झाला. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना पाकिस्तानने अवघ्या पाच धावांनी जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. सामन्यात हैदर अली आणि अनुभवी मोहम्मद हाफीज यांनी अर्धशतके ठोकली. १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या मोईन अलीने एकाकी झुंज दिली, पण अखेर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन अर्धशतके ठोकणाऱ्या मोहम्मद हाफीजला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले.

पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सावध सुरूवात केली. फखर झमान स्वस्तात बाद झाला. बाबर आझमला (२१) चांगली सुरूवात मिळाली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणारा हैदर अली आणि हाफीज यांनी धडाकेबाज खेळी केल्या. अलीने ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. पहिल्याच टी२० मध्ये अर्धशतक ठोकणारा तो पहिलाच पाकिस्तानी खेळाडू ठरला. हाफीजने नाबाद राहत ५२ चेंडूत ८६ धावा कुटल्या. त्यात ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

१९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या गोटातील खेळाडूंनी मोठी भागीदारी करता आली नाही. सॅम बिलींग्स आणि मोईन अली यांच्यात चांगली भागीदारी झाली, पण मोक्याच्या क्षणी बिलींग्स बाद झाला. त्याने २६ धावा केल्या. मोईन अलीने १९व्या षटकापर्यंत झुंज दिली. पण अखेर तो ६१ धावांवर बाद झाला. त्यामुळे अखेर इंग्लंडला पाच धावांनी पराभूत व्हावं लागलं.