लॉकडाउन काळात जुन्या सामन्यांच्या हायलाईट्स पाहून आनंद घेणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी बुधवारचा दिवस हा आनंदाचा होता. तब्बल ४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु झालं, मात्र पहिल्याच दिवशी वरुणराजाने केलेल्या अवकृपेमुळे इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस वाया गेला. साऊदम्पटनच्या मैदानावर बुधवारपासून इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेला सुरुवात झाली. परंतू दिवसभर पावसाचं आगमन आणि खराब वातावरणामुळे अखेरीस पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

साऊदम्पटनमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीसीच्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं होतं. परंतू सामना सुरु होण्यासाठी विलंब झाल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. अखेरीस काहीकाळ पावसाने उसंत घेतल्यानंतर नाणेफेक झाली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजने धडाकेबाज सुरुवात करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. शेनॉन गॅब्रिअलने इंग्लंडच्या डोम सिबलीला भोपळाही न फोडू देता माघारी धाडलं. यानंतर रोरी बर्न्स आणि जो डेनली या फलंदाजांनी बाजू सावरत इंग्लंडला १ बाद ३५ अशी मजल मारुन दिली. यानंतर पावसामुळे पुन्हा एकदा सामना थांबवण्यात आला.

अवश्य वाचा – Black Lives Matter : वर्णद्वेषाविरोधात इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी उठवला आवाज

यानंतर पाऊस थांबण्याची वाट पाहण्यात आली, पण पाऊस उसंत घेत नसल्याचं दिसताच पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केला. इंग्लंडकडून जो डेनली नाबाद १४ तर रोरी बर्न्स नाबाद २० धावांवर खेळत होते. दरम्यान पहिल्या दिवशी सामना सुरु होण्याआधी, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी सामना सुरु होण्याआधी वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवला. विंडीज-इंग्लंडचे खेळाडू आणि पंचांनी सामना सुरु होण्याआधी मैदानात एका गुडघ्यावर बसून एक हात उंच करत वर्णद्वेषाला विरोध दर्शवला.