शेनॉन गॅब्रिअल आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी विंडीजच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला. दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावांपर्यंत मजल मारली.

पहिल्या दिवसाच्या खेळात गॅब्रिअलने इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिबलेला त्रिफळाचीत केलं. यानंतर पहिल्या दिवसाअखेरीस इंग्लंडने १ बाद ३५ अशी मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर गॅब्रिअलने जो डेनलीचा त्रिफळा उडवला. यासोबतच ग्रॅबिअल गेल्या ३ वर्षांत विंडीजकडून सर्वाधिक वेळा प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्रिफळाचीत करणारा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत त्याने २७ वेळा अशी कामगिरी केली आहे.

याचसोबत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या डावात आघाडीच्या ३ फलंदाजांना सहकारी खेळाडूंच्या मदतीशिवाय बाद करणारा गॅब्रिअल पाचवा गोलंदाज ठरला आहे. गॅब्रिअलने इंग्लंडच्या पहिल्या ३ फलंदाजांपैकी दोघांचा त्रिफळा उडवला तर एकाला पायचीत बाद केलं. पाहूयात अशी कामगिरी करणारे गोलंदाज…

  • इयान पिल्बेस (इंग्लंड) विरुद्ध न्यूझीलंड – १९३१
  • अ‍ॅलेक्स बेडसर (इंग्लंड) विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १९५३
  • अनिल कुंबळे (भारत) विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २००४
  • चनका वेलगेदेरा (श्रीलंका) विरुद्ध भारत – २००९
  • शेनॉन ग्रॅब्रिअल (वेस्ट इंडिज) विरुद्ध इंग्लंड – २०२०

उपहाराच्या सत्रापर्यंत गॅब्रिअलव्यतिरीक्त कर्णधार जेसन होल्डरने दोन फलंदाजांना माघारी धाडलं.