इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळही अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. पहिल्या डावात कर्णधार जेसन होल्डर आणि शेनॉन गॅब्रिअल यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव २०४ धावांत आटोपला. होल्डरने ६ तर गॅब्रिअलने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल विंडीजच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात चांगली केली होती. क्रेग ब्रेथवेट आणि जॉन कॅम्पबेल यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारीही झाली. विंडीजने अर्धशतकी धावसंख्या गाठल्यानंतर पंचांनी अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबवला.

कर्णधार जेसन होल्डर आणि शेनॉन गॅब्रिअल यांच्या माऱ्यासमोर इंग्लिश फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार बेन स्टोक्सने एकाकी झुंज देत ४३ धावा केल्या, पण त्यालाही संघाची बाजू सावरणं जमलं नाही. यादरम्यान बेन स्टोक्सकडे एक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी होती. पण विंडीजच्या गोलंदाजांनी त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.

दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या फलंदाजांनी केलेल्या भागीदारीमुळेच इंग्लंडने आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठला. मात्र उपहारानंतर जेसन होल्डरने स्टोक्स आणि बटलरची जोडी फोडत इंग्लंडला धक्का दिला. इंग्लंडच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी विंडीज गोलंदाजांचा फारसा सामना करण्याची तसदी घेतली नाही. अखेरीस २०४ धावांवर इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला.