इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी शेनॉन गॅब्रिअलने इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला माघारी धाडत यजमान संघाला मोठा धक्का दिला. एकीकडे संघाची पडझड होत असताना दुसऱ्या बाजूने सलामीवीर रोरी बर्न्सने विंडीजच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. ८५ चेंडूत ४ चौकारांसह बर्न्सने ३० धावांची खेळी केली. यानंतर गॅब्रिअलनेच बर्न्सला पायचीत पकडत माघारी धाडलं.

मात्र या छोटेखानी खेळीदरम्यान बर्न्सने इंग्लंडचा सलामीवीर या नात्याने कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. बर्न्सच्या आधी इंग्लंडकडून कूकने २००७ साली अशी कामगिरी केली होती. त्यामुळे जवळपास १३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर इंग्लंडच्या सलामीवीराला कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणं जमलं आहे.

दरम्यान गॅब्रिअल आणि होल्डर या जोडीने भेदक मारा करत इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला. गॅब्रिअलने बर्न्स, सिबले आणि डेनली तर होल्डरने क्रॉली आणि पोप या फलंदाजांना माघारी धाडलं.