तब्बल ४ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात विंडीज कर्णधार जेसन होल्डरने आपली चमक दाखवली आहे. यजमान इंग्लंडच्या संघाला आपल्या तालावर नाचवर होल्डरने निम्मा संघ गारद केला. होल्डर आणि गॅब्रिअल यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव पुरता कोसळला. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने पाच बळी घेण्याची जेसन होल्डरची ही सातवी वेळ ठरली आहे. यादरम्यान होल्डरने माजी विंडीज कर्णधार कर्टनी वॉल्श यांच्या कामगिरीशी बरोबरी केली.

दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत गॅब्रिअल आणि होल्डर जोडीने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने विंडीजच्या गोलंदाजीचा सामना करत ४३ धावांची खेळी केली. यष्टीरक्षक बटलरनेही त्याला चांगली साथ दिली. मात्र होल्डरने दोघांनाही माघारी धाडत सामन्यावर विंडीजचं वर्चस्व प्रस्थापित केलं. होल्डरने या धडाकेबाज कामगिरीसोबत आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स, रोरी बर्न्स आणि जोस बटलर यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज विंडीजच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही.