सलामीवीर डोम सिबले आणि मधल्या फळीत अष्टपैलू बेन स्टोक्सने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर यजमान इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. ९ बाद ४६९ वर आपला पहिला डाव घोषित केल्यानंतर, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेरीस विंडीजची अवस्था १ बाद ३२ अशी केली. स्टोक्स आणि सिबले यांनी विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. सिबलेने १२० तर स्टोक्सने १७६ धावा केल्या. स्टोक्सच्या खेळात १७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

या शतकी खेळीसह बेन स्टोक्सने दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान पक्क केलं आहे. कसोटीत ४ हजार धावा, १० शतकं आणि १५० बळी अशी तिहेरी कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आता स्टोक्सला स्थान मिळालं आहे.

स्टोक्स आणि सिबलेची जोडी फोडण्यासाठी विंडीजच्या गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. अखेरीस रोस्टन चेसने केमार रोचकरवी सिबलेला झेलबाद करत विंडीजला यश मिळवून दिलं.