वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत बरोबरी साधण्यात अखेरीस यजमान इंग्लंडला यश आलं. सलामीचा सामना गमावल्यानंतर इंग्लंडने अखेरच्या दिवशी विजयश्री खेचून आणत वेस्ट इंडिजवर ११३ धावांनी मात केली. या विजयासह ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे. अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी ३१२ धावांचं दिलेलं आव्हान त्यांना पेलवलं नाही. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा डाव कोसळला.

इंग्लंडच्या बेन स्टोक्स अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्यासोबतच इंग्लंडचा ख्रिस वोक्स यानेही सामन्यात एक पराक्रम केला. त्याने पहिल्या डावात ३ बळी टिपले तर दुसऱ्या डावात २ बळी बाद केले. या बळींच्या सहाय्याने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळींचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा आणि १०० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा वोक्स हा इंग्लंडचा १६वा खेळाडू ठरला. तसेच अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा तिसरा सर्वात जलद खेळाडू ठरला. त्याने ३४व्या कसोटीत ही किमया साधली. याआधी इयन बोथमने २१व्या तर मॉरीस टेलने ३३व्या कसोटी ही कामगिरी फत्ते केली होती. बेन स्टोक्सला या कामगिरीसाठी ४३ कसोटी सामने खेळावे लागले होते.

असा रंगला सामना

दुसऱ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ४६९वर डाव घोषित केला. प्रतुत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २८७ धावांत आटोरला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात १८२ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडच्या तिसऱ्या डावात स्टोक्सच्या धडाकेबाज नाबाद ७८ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजला ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले. पण वेस्ट इंडिजला ते आव्हान पेलवलं नाही. अवघ्या ३७ धावांत विंडीजचे चार शिलेदार माघारी परतले. त्यानंतर ब्रुक्स, ब्लॅकवूड आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी थोडीफार झुंज दिली. ब्रुक्सने ६२, ब्लॅकवूडने ५५ तर कर्णधार जेसन होल्डरने ३५ धावा केल्या. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या स्टोक्सला सामनावीर जाहीर करण्यात आले.