दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने १ बाद ३२ धावा केल्या. तत्पूर्वी इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ४६९ धावांवर घोषित केला. खराब सुरूवातीनंतर इंग्लंडच्या डॉम सिबली आणि बेन स्टोक्स यांनी अप्रतिम खेळ करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. स्टोक्सने १७६ तर सिबलीने १२० धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून फिरकीपटू रॉस्टन चेसने पाच गडी बाद केले.

पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन केले, पण नाणेफेक वेस्ट इंडिजने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीची निवड केली. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने सावध पवित्रा घेतला. फिरकीपटू रॉस्टन चेसने रॉरी बर्न्स (१५) आणि झॅक क्रॉली (०) यांना लागोपाठ बाद केले. कर्णधार जो रुटही (२३) स्वस्तात बाद झाला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ३ बाद ८१ अशी होती. नंतर सलामीवीर डॉम सिबली आणि बेन स्टोक्स यांनी विंडीजचा डाव सावरला. त्यांनी २६० धावांची भागीदारी करत इंग्लंडल भक्कम स्थितीत आणले. स्टोक्सने १७ चौकार आणि २ षटकारांसह १७६ धावा ठोकल्या तर सिबलीने ५ चौकारांसह १२० धावा केल्या.

स्टोक्स आणि सिबली बाद झाल्यावर जोस बटलरने (४०) एक बाजू लावून धरली पण दुसऱ्या बाजून गडी बाद होत राहिले. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या डॉम बेसनेही ३१ धावा केल्या. अखेर दिवस संपण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक असताना इंग्लंडने ४६९ धावांवर डाव घोषित केला.

त्यानंतर वेस्ट इंडिजने डावाची सुरूवात केली. पण सॅम करनने त्यांना धक्का दिला. जॉन कॅम्पबेल १२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर नाइट वॉचमन म्हणून आलेल्या अल्झारी जोसेफने (१४*) क्रेग ब्रेथवेट (६*) सोबत दिवस संपेपर्यंत खेळपट्टी सांभाळली.