वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंडला थोडी वाट पहावी लागणार आहे. मँचेस्टर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला आहे. त्यामुळे मालिकेत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांना अखेरच्या दिवशी संघर्ष करावा लागणार आहे. सोमवारी मँचेस्टरमध्ये दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हाच आराखडा बांधत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव २२६/२ वर घोषित केला होता.

विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजच्या संघाची तिसऱ्या दिवशी खराब सुरुवात झाली. अवघ्या १० धावांत पाहुण्या विंडीजचे २ बळी माघारी परतले. चौथ्या दिवशी खेळाडू पाऊस उसंत घेतो का याची वाट पाहत होते. परंतू दोन सत्र पावसामुळे वाया गेल्यानंतर अखेरीस पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी चौथ्या दिवसाचा खेळ रद्द केला. त्यामुळे अखेरच्या दिवशी इंग्लंडचे गोलंदाज काय रणनिती घेऊन मैदानात उतरतात आणि विंडीजचे फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजचा पहिला डाव इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे १९७ धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेरीस मोठी आघाडी मिळाली. त्यातच दुसऱ्या डावात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी शतकी भागीदारी केल्यानंतर सिबली (५६) बाद झाला. त्यानंतर कर्णधार जो रूटच्या साथीने बर्न्सने डाव पुढे नेला. शतकाच्या नजीक असताना बर्न्स ९० धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रूटने (नाबाद ६८) डाव घोषित केला.