वेस्ट इंडिजविरुद्ध मँचेस्टर कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आपला पहिला डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात वेस्ट इंडिजची अवस्था ६ बाद १३७ अशी केली आहे. इंग्लंडकडून दुसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडने अष्टपैलू कामगिरी केली. ब्रॉडने फलंदाजीत ६२ धावांची खेळी करुन संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली, तर गोलंदाजीत दोन बळी घेत विंडीजला बॅकफूटवर ढकलण्यात मोलाची भूमिका बजावली.

पहिल्या दिवशी ४ गड्यांच्या मोबदल्यात द्विशतकी मजल मारणाऱ्या इंग्लंडची दुसऱ्या दिवशी खराब सुरुवात झाली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेला पोप एकही धाव न काढता माघारी परतला. ९१ धावांवर गॅब्रिअलने त्याचा त्रिफळा उडवला. मात्र दुसऱ्या बाजूने जोस बटलरने एक बाजू लावून धरत इंग्लंडची झुंज सुरु ठेवली. बटलर माघारी परतल्यानंतर इंग्लंडची अखेरची फळी लवकर माघारी परतेल असा अंदाज होता. परंतू स्टुअर्ट ब्रॉडने विंडीजच्या मनसुब्यांवर पाणी फिरवत धडाकेबाज अर्धशतक झळकावलं. ब्रॉडने ४५ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ब्रॉडने आपलं अर्धशतक ३३ चेंडूत पूर्ण केलं. विंडीजकडून पहिल्या डावात केमार रोचने ४ बळी घेत २०० बळींचा टप्पा गाठला. त्याला शेनॉन गॅब्रिअल आणि रोस्टन चेसने प्रत्येकी २-२ तर जेसन होल्डरने एक बळी घेत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Eng vs WI : स्टुअर्ट ब्रॉडचा विंडीजला तडाखा, झळकावलं धडाकेबाज अर्धशतक

प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. क्रेग ब्रेथवेट ब्रॉडच्या गोलंदाजीवर रुटकडे झेल देत माघारी परतला. कँपबेल आणि शाई होप यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू जोफ्रा आर्चरने ही जोडी फोडत विंडीजला आणखी एक धक्का दिला. यानंतर चहापानाआधी आणि चहापानंतर तात्काळ अँडरसने बळी घेत इंग्लंडला पूरत बॅकफूटवर ढकललं. अवघ्या ७३ धावांवर विंडीजचा निम्मा संघ माघारी परतला. यानंतर कर्णधार जेसन होल्डर आणि डावरिच यांनी अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अंधुक प्रकाशामुळे पंचांनी सामना लवकर थांबवला. दिवसाअखेरीस कर्णधार होल्डर २४ तर डावरिच १० धावांवर खेळत आहेत.

अवश्य वाचा – Eng vs WI : केमार रोच चमकला, पूर्ण केलं बळींचं द्विशतक