करोनाच्या भीतीने सुमारे चार महिने बंद असलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेच्या रूपाने सुरू झालं. क्रिकेटच्या पुनरागमनानंतर पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने सहा बळी घेत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपल्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या आणि ११४ धावांची आघाडी घेतली.

वेस्ट इंडिजच्या शॅनन गॅब्रियलने इंग्लंडवला सुरूवातीला धक्के दिले. त्यातही गॅब्रियलने जो डेन्टलीचा उडवलेला त्रिफळा चांगलाच चर्चेत आला. २३ व्या षटकात गॅब्रियल गोलंदाजीसाठी आला. त्यानेच इंग्लंडला शून्यावर पहिला धक्का दिला होता. पण त्यानंतर डेन्टली आणि बर्न्स यांनी अर्धशतकी भागीदारीच्या नजीक मजल मारली होती. पण इंग्लंडच्या ४८ धावा असताना गॅब्रियलने गोलंदाजी करत चेंडू इन स्विंग केला. डेन्टलीला तो चेंडू कसा खेळावा हे कळायच्या आतच चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि डेन्टलीला तंबूचा रस्ता धरावा लागला.

दरम्यान, सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली, पण स्टोक्सने जोस बटलर आणि डॉम बेस यांच्या साथीने संघाला द्विशतकी मजल मारून दिली. स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या, तर बटलरने ३५ आणि बेसने नाबाद ३१ धावा केल्या. गॅब्रियल आणि होल्डर यांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा फार काळ निभाव लागला नाही. इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. होल्डरने सहा तर गॅब्रियलने ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. क्रेग ब्रेथवेट (६५) आणि शेन डावरिच (६१) यांनी दमदार अर्धशतके ठोकली. रॉस्टन चेसनेही चांगली खेळी करत ४७ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने त्रिशतकी मजल मारली. स्टोक्सने ४, अँडरसनने ३, बेसने २ तर मार्क वूडने १ गडी बाद केला.