पहिल्या डावात शतकी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद २८४ धावांपर्यंत मजल मारली. उपहारापर्यंत दमदार खेळ करणाऱ्या इंग्लंडला पुढील दोन सत्रात अपेक्षित पद्धतीने धावा जमवता आल्या नाहीत. क्राव्हली (७६), सिबली (५०) यांची अर्धशतके आणि कर्णधार स्टोक्सची दमदार खेळी (४६) यांच्या बळावर इंग्लंडने १५० धावांची आघाडी गाठली, पण इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे आता इंग्लंडचे केवळ दोन गडी शिल्लक असून त्यांच्याकडे १७० धावांची आघाडी आहे.

इंग्लडंच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या सिबलीने दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर रॉरी बर्न्सदेखील चांगला खेळ करत होता, पण अर्धशतकाच्या नजीक येताना ४२ धावांवर तो रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर सिबलीने डेन्टलीच्या साथीने धावा करणं सुरू ठेवलं. उपहारापर्यंत इंग्लंडने १ बाद ७९ धावांपर्यंत मजल मारली. सिबली ५० धावांवर माघारी परतला, तर डेन्टली २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली. या दोघांनी ९८ धावांची भागीदारी केली हे दोघे एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर इतर फलंदाज झटपट बाद झाले. गॅब्रियलने ३, होल्डर-चेसने प्रत्येकी २ तर होल्डरने १ बळी टिपला.

त्याआधी, इंग्लंडचा पहिला डाव फलंदाजांसाठी फारसा चांगला ठरला नव्हता. सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली, पण स्टोक्सने जोस बटलर आणि डॉम बेस यांच्या साथीने संघाला द्विशतकी मजल मारून दिली. स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या, तर बटलरने ३५ आणि बेसने नाबाद ३१ धावा केल्या. गॅब्रियल आणि होल्डर यांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा फार काळ निभाव लागला नाही. इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. होल्डरने सहा तर गॅब्रियलने ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. क्रेग ब्रेथवेट (६५) आणि शेन डावरिच (६१) यांनी दमदार अर्धशतके ठोकली. रॉस्टन चेसनेही चांगली खेळी करत ४७ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने त्रिशतकी मजल मारली. स्टोक्सने ४, अँडरसनने ३, बेसने २ तर मार्क वूडने १ गडी बाद केला.