विंडीज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने झंझावाती खेळी केली. विंडीजचा पहिला डाव २८९ धावांत आटोपल्यानंतर इंगलंचा संघ केवळ ७७ धावांत गारद झाला. त्यामुळे पहिल्या डावात विंडीजने २१२ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर विंडीजच्या दुसऱ्या डावात होल्डरने आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन धडाकेबाज द्विशतकी (२०२) खेळी केली.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजचा पहिला डाव २८९ धावांत आटोपला. या डावात हेटमायरने ८१ तर रॉस्टन चेस आणि शाय होपने अर्धशतके केली होती. त्यानंतर इंग्लंडचा डाव मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पहिल्या डावात केबल ४ खेळाडूंना दोन अंकी धावसंख्या गाठता आली. वेगवान गोलंदाज केमार रोच याने १७ धावांत ५ बळी टिपले.

इंग्लडच्या खराब कामगिरीनंतर विंडीजने इंग्लंडला फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे फसल्याचे सुरुवातीला दिसून आले. विंडीजची अवस्था ६ बाद १२० अशी झाली होती. मात्र विंडीजचा कर्णधार होल्डर याने धडाकेबाज खेळी केली. त्याने २२९ चेंडूत २०२ धावा केल्या. त्याने २३ चौकार आणि ८ षटकार ठोकत आठव्या क्रमांकावर फलंदाजी करून द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने आठव्या क्रमांकावर येऊन २५३ धावा केल्या होत्या तर इम्तियाझ अहमद याने २०९ धावा केल्या होत्या.

दरम्यान, होल्डरच्या नाबाद द्विशतकामुळे (२०२) आणि डावरीचच्या नाबाद शतकामुळे (११६) विंडीजने ६ बाद १२० वरून ६ बाद ४१५ धावांवर डाव घोषित केला.