02 April 2020

News Flash

इंग्लंडचे स्थित्यंतर!

२०१५च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडची सुरुवातीलाच धूळधाण उडाली.

|| तुषार वैती

२०१५च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडची सुरुवातीलाच धूळधाण उडाली. इंग्लंडकडून हे अपेक्षित नव्हतेच. पण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच नव्हे तर श्रीलंका आणि बांगलादेशकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर इंग्लंडचे आव्हान गटसाखळीतच संपुष्टात आले. क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडवर ही नामुष्की ओढवेल, असे कुणालाही वाटले नव्हते. तीन दशकांत तीन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणारा इंग्लंडचा संघ गेल्या दोन दशकांत केवळ सहभागापुरताच मर्यादित राहिल्याचे अधोरेखित झाले.

चार वर्षांपूर्वी इंग्लंडच्या बाबतीत असे का घडले, याचा कुणालाही थांगपत्ता लागत नव्हता. प्राथमिक स्तरावर चौकशी करण्याचा प्रयत्न केला तरी नेमके कारण स्पष्ट होत नव्हते. मग या समस्येच्या मुळाशी जाण्याचे इंग्लंडने ठरवले. बदल हा निसर्गाचा नियम आहे, हे सत्य ओळखून त्यांनी आपल्या खेळण्याच्या शैलीत, मानसिकतेत आणि संघात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार केला. ३०० धावांचे आव्हान उभे करण्याची किंवा ते पार करण्याची क्षमता आपल्याकडे नाही. त्यामुळे दुबळ्या संघाकडूनही पराभवाला सामोरे जावे लागत आहे, हे त्यांना कळून चुकले. २०१५च्या विश्वचषकाआधी इंग्लंडचे नेतृत्व ईऑन मॉर्गनकडे आले होते, त्यामुळे त्यांनी पीटर मूर्स यांच्याऐवजी ट्रेव्हर बेलिस यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.

इंग्लंड संघात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंची (मॅचविनर) वानवा आहे, हे मॉर्गनच्या लक्षात आले होते. त्यामुळेच त्यांनी जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, जेसन रॉय, जो रूट, आदिल रशीद, मोईन अली आणि जोफ्रा आर्चर यांच्यावर अधिक मेहनत घेतली. सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवण्याचे धोरण त्यांनी आखले. कुण्या एका फलंदाजावर अवलंबून राहायचे नाही, यासाठी त्यांनी आपल्या फलंदाजीची ताकद वाढवली. कोणत्याही वातावरणात मैदानावर टिकून राहणे, स्विंग होणाऱ्या चेंडूंवर, तसेच फिरकीपटूंवर फलंदाजीचा सराव त्यांनी घोटून घेतला. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत जगातल्या कोणत्याही संघाला प्रभावी स्थित्यंतर घडवता आले नाही, तो करिश्मा इंग्लंडने करून दाखवला आहे.

गेल्या चार वर्षांत इंग्लंडने कात टाकली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. २०११ ते २०१५च्या विश्वचषकादरम्यान इंग्लंडला ७९ सामन्यांत फक्त पाच वेळा ३०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारता आली होती. पण २०१५नंतर इंग्लंडने तब्बल २३ वेळा ३०० पेक्षा जास्त धावांची बरसात केली. इतकेच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम त्यांनी दोन वेळा मोडीत काढला. आधी २०१६मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३ बाद ४४४ धावा आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाविरुद्ध ६ बाद ४८१ धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. १६ वेळा त्यांनी ३५०पेक्षा अधिक धावांचा पल्ला गाठला असून चार वेळा ४००पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत. जेसन रॉय, बटलर आणि बेअरस्टो यांचा झंझावात असाच कायम राहिला तर घरच्या वातावरणातील फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर इंग्लंड ५०० धावांचा डोंगरही सहज उभारेल, अशी शक्यता आहे.

इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या खेळण्याच्या शैलीत केलेल्या सुधारणेचे फळ त्यांना गेल्या चार वर्षांत मिळाले. २०१५च्या आधी चार वर्षांत इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त २० शतके सादर केली होती. पण २०१५च्या विश्वचषकानंतर त्यात जवळपास दुपटीपेक्षाही वाढ झाली असून, ४८ शतके फलंदाजांनी आपल्या नावावर केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवत इंग्लंडने ८८ पैकी ५८ सामने जिंकले आहेत.

इंग्लंडने फक्त फलंदाजीच्या जोरावरच घवघवीत यश संपादन केले नसून त्यात गोलंदाजांनीही मोलाची भूमिका बजावली आहे. गेल्या चार वर्षांत फिरकीपटू आदिल रशीदच्या गोलंदाजीची धार आणखीनच वाढली आहे. फिरकीपटू मोईन अलीही तितकाच प्रभावी ठरत असून जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स, लियाम प्लंकेट आणि बेन स्टोक्स या वेगवान गोलंदाजांवरही इंग्लंडने अधिक मेहनत घेतली. इंग्लंडला चेंडूला स्विंग मिळणाऱ्या खेळपट्टय़ांवर सामना जिंकून देणाऱ्या गोलंदाजाची आवश्यकता भासत होती. आर्चरच्या रूपाने इंग्लंडची ती उणीव भरून निघेल, असे वाटत असल्यामुळेच इंग्लंडने भरवशाच्या डेव्हिड विलीला विश्वचषकाच्या संघात स्थान दिले नाही. बदललेली क्रिकेटची शैली, आक्रमकतेची कास आणि गोलंदाजीचे नवे रूपडे यामुळे इंग्लंडची मायदेशात तरी विश्वचषकाची स्वप्नपूर्ती होईल का, हे पाहणेच रंजकतेचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2019 2:04 am

Web Title: england 2019 cricket world cup
Next Stories
1 Cricket World Cup 2019 : न्यूझीलंडची विजयी सुरुवात, श्रीलंकेवर १० गडी राखून मात
2 रविंद्र जाडेजा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचं प्रशस्तीपत्रक
3 विराट कोहली अप्रगल्भ, स्वतःवर टीका केलेली सहन होत नाही !
Just Now!
X