इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि ५३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. याबरोबरच सलग दुसरी कसोटी जिंकल्याने चार कसोटींच्या मालिकेत पाहुण्या इंग्लंडने २-१ आघाडी घेतली.

इतकेच नाही तर ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद’ स्पर्धेत इंग्लंडने ११६ गुणांसह तिसरे स्थान भक्कम केले आहे. ६ बाद १०२ धावांवरून खेळ सुरू केलेल्या दक्षिण आफ्रिकेने त्यांचा पराभव लांबवला तो केशव महाराज (७१) आणि डेन पॅटरसन (नाबाद ३९) या जोडीने अखेरच्या गडय़ासाठी ९९ धावांची भागीदारी करून. त्यातच इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटच्या एका षटकात त्याने २८ धावा मोजल्या. त्याबरोबर एका षटकात सर्वाधिक २८ धावा देणाऱ्या नको त्या विक्रमाशी रुटची बरोबरी झाली. मात्र डावात सर्वाधिक चार बळी रुटने घेतले. ऑली पोप सामनावीर ठरला. मालिकेतील चौथी आणि अखेरची कसोटी २४ जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे.