यजमानांचा पहिला डाव २५८ धावांत गारद

लंडन : जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायनच्या प्रभावी गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमानांचा पहिला डाव २५८ धावांमध्ये गारद झाला.

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यानंतर पुढील चारही दिवस ९८ षटकांचा खेळ होणार आहे. त्याचबरोबर फॉलो-ऑन २०० धावांवरून १५० धावांवर आणण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडची दुसऱ्या कसोटी सामन्यातही सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या कसोटीतील विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या अंतिम संघात स्थान मिळालेल्या जोश हेझलवूडने दुसऱ्या षटकांतील तिसऱ्याच चेंडूवर जेसन रॉयच्या (०) रूपाने इंग्लंडला पहिला धक्का दिला. हा धक्का पचवत नाही तोच हेझलवूडने जो रूटला (१४) माघारी पाठवत इंग्लंडला संकटात टाकले.

सलामीवीर रॉरी बर्न्‍स आणि जो डेन्ली (३०) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ६६ धावांची भर घालत इंग्लंडचा डाव सावरला. बर्न्‍सला दोन वेळी पीटर सिडलने जीवदान दिले. पण बर्न्‍स ५३ धावांची खेळी करून माघारी परतल्यावर इंग्लंडच्या डावाला उतरती कळा लागली. डेन्सीसुद्धा मोठे योगदान देण्यात अपयशी ठरल्यानंतर जोस बटलर (१२) आणि बेन स्टोक्स (१३) यांनीही निराशा केली. त्यामुळे उपहारानंतर इंग्लंडने अवघ्या ४६ धावांच्या अंतराने चार बळी गमावले.

हेझलवूम्डने आघाडीची फळी नेस्तनाबूत केल्यानंतर लायन आणि कमिन्स यांनी इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स (३२) यांनी सातव्या गडय़ासाठी ७२ धावा जोडल्यामुळे इंग्लंडला दोनशे धावांचा पल्ला ओलांडता आला. बेअरस्टोने अखेपर्यंत किल्ला लढवत ९५ चेंडूंत ७ चौकारांसह ५२ धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूड, लायन आणि कमिन्स यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. पीटर सिडलने एक बळी टिपला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ७७.१ षटकांत २५८ (रॉरी बर्न्‍स ५३, जॉनी बेअरस्टो ५२, ख्रिस वोक्स ३२, जो डेन्ली ३०; जोश हेझलवूड ३/५८, पॅट कमिन्स ३/६१, नॅथन लायन ३/६८) वि. ऑस्ट्रेलिया.