इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. पाचवा टी-20 सामना संपल्यानंतर इंग्लंड संघ व्यवस्थापन आर्चरबाबत निर्णय घेऊ शकतो. यापूर्वी दुखापतीमुळे आर्चरने भारताविरुद्धचा चौथा कसोटी सामना खेळला नव्हता. त्यानंतर टी-20 मालिकेतही त्याच्या खेळण्याबद्दल बरीच शंका निर्माण झाली होती.

मात्र, टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त झाला. त्याने मालिकेतील चारही सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. सध्या तो मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. पाचव्या टी-20 सामन्यातही तो खेळण्याची अपेक्षा आहे.

 

सातत्याने खेळतोय आर्चर 

टी -20 मालिकेदरम्यान जोफ्रा आर्चरला कोणतीही समस्या उद्भवली नसली, तरी संघ व्यवस्थापन त्याच्यावर जास्त ताण येऊ नये, असा विचार करत आहे. एका वृत्तानुसार, याच कारणास्तव त्याला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. यावर्षी टी-२० वर्ल्डकप आणि अ‌ॅशेस मालिकादेखील आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला आर्चरबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नाही.

इंग्लंडच्या अन्य गोलंदाजांना संधी

आर्चरला बाहेर ठेवण्याचे अजून एक कारण म्हणजे, इंग्लंडच्या अन्य वेगवान गोलंदाजांना भारतीय परिस्थितीत खेळण्याची संधी मिळेल. आगामी टी-20 आणि एकदिवसीय वर्ल्डकप भारतातच होणार असून, त्यादृष्टीने संघ व्यवस्थापन विचार करत आहे.

इंग्लंडने अद्याप वनडे मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केलेली नाही. दोन्ही संघांमध्ये 23 मार्चपासून एकदिवसीय मालिका खेळली जाईल. या मालिकेचा शेवटचा सामना 28 मार्च रोजी होईल. हे तिन्ही सामने पुण्यात होणार आहेत.