इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू पॉल कॉलिंगवूडने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर २२ वर्षांनंतर यंदाच्या हंगामासह व्यावसायिक कारकीर्दीतून निवृत्त होणार असल्याचे कॉलिंगवूडने स्पष्ट केले.

तीन वेळा अ‍ॅशेस विजेत्या संघात समावेश असलेल्या कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१०मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम दाखवला होता. त्याने ६८ कसोटी, १९७ एकदिवसीय आणि ३६ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.

‘‘बराच विचारविनिमय आणि चर्चा करून चालू हंगाम संपल्यावर निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस एकदा येणार आहे, याची पूर्णत: जाणीव होती. हा भावनिक निर्णय असला तरी हा योग्य निर्णय आहे, याची मला खात्री आहे. अखेरच्या श्वासापर्यंत खेळासाठी मी कार्यरत राहीन,’’ असे ४२ वर्षीय कॉलिंगवूडने सांगितले.

कॉलिंगवूड प्रतिनिधित्व करीत असलेल्या डरहॅम क्रिकेट क्लबचे अध्यक्ष इयान बोथम म्हणाले, ‘‘पॉल हा महान अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक आहे. डरहॅमकडून कौंटी क्रिकेट खेळताना याचा अनेकदा प्रत्यय आला आहे.’’