तिसऱ्या कसोटीत भरताने इंग्लंडवर दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. सामना संपल्यावर माजी इंग्लिश खेळाडूंनी खेळपट्टीसंदर्भात टिपण्णी केली. पण इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने मात्र इंग्लंडच्या फलंदाजांची तुलना भित्र्या सश्याशी केली.

Ind vs Eng: विराटने ठेवलं अश्विनचं नवीन नाव

लहानपणी अनेकांनी पान पाठीवर पडणाऱ्या भित्र्या सशाची गोष्ट ऐकली असेल. झाडाचे पान पाठीवर पडल्यानंतर ढगफुटी झाल्याची समजून करून घेणारा आणि सैरावैरा पळणारा ससा अशी इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था झाली होती असं तो म्हणाला. “पहिल्या डावात भारताला केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात इंग्लंडला चांगली आघाडी घेण्याची संधी होती. पण इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था भित्र्या सश्यासारखी झाली होती. ही खेळपट्टी फलंदाजीच्या दृष्टीने चेन्नईपेक्षा कठीण होती, पण ८१ धावांवर संघाने बाद व्हावे इतकीही खेळपट्टी वाईट नव्हती”, असं हुसेन स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला.

“इंग्लंडने जे केलं तसं ‘टीम इंडिया’ने कधीच केलं नसतं…”

“अहमदाबादसारख्या खेळपट्टीवर काही चेंडू वळतात तर काही अगदीच सरळ येतात. अशा ठिकाणी फलंदाज आपली लय गमावण्याची शक्यता अधिक असते. अशाच खेळपट्ट्यांवर पुढील कसोटी सामने खेळले गेले तर फलंदाज अधिकच बुचकळयात पडतील. चेन्नईच्या खेळपट्टीवर चेंडू खूपच वळत होता. तसाच इथेही पहिल्या दिवशी अर्धशतकवीर जॅक क्रॉलीला टाकण्यात आलेला चेंडू वळला. पण इंग्लंडच्या गोलंदाजांची एक चूक झाली. ते प्रत्येक चेंडू वळेल म्हणून खेळत होते आणि सरळ येणाऱ्या चेंडूंवर ते बाद झाले”, असं विश्लेषण त्याने केले.