कर्णधार मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. रविवारी साउदम्पटनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने ६ गडी राखून बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं १५८ धावांचं आव्हान इंग्लंडने सहज पूर्ण केलं. नाबाद ७७ धावा करणारा जोस बटलर सामनावीर ठरला.

ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला. पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. जोफ्रा आर्चरने यष्टीरक्षक बटलरकरवी त्याला झेलबाद केलं. यानंतर यष्टीरक्षक कॅरीही मार्क वुडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. भरवशाचा स्टिव्ह स्मिथही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात धावबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला. यानंतर कर्णधार फिंच आणि स्टॉयनिसने भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. ख्रिस जॉर्डनने फिंचचा त्रिफळा उडवत इंग्लंडला आणखी एक यश मिळवून दिलं.

यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही फटकेबाजी करत संघाला १५७ धावांचा टप्पा गाठून दिला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने २ तर जोफ्रा आर्चर-मार्क वुड-आदिल रशिद या त्रिकुटाने १-१ बळी घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज धावबाद झाले.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या संघाची सुरुवातही काहीशी अडखळत झाली. सलामीवीर जॉनी बेरअस्टोही अवघ्या ९ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र यानंतर जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांनी चौफेर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. बटलरने ५४ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७७ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने मलाननेही ४२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडच्या या झंजावाती फलंदाजीवर नियंत्रण ठेवणं ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. अखेरीस ६ गडी राखून सामन्यात बाजी मारत इंग्लंडने मालिकेवर कब्जा केला आहे.