ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेवर मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मलानच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं १४७ धावांचं आव्हान पूर्ण केलं. ४ गडी राखून इंग्लंडने सामना जिंकत मालिकाही खिशात घातली आहे. मलानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बावुमा आणि डी-कॉक जोडीने आफ्रिकेला आश्वासक सुरुवात करुन दिली. जोफ्रा आर्चरने बावुमाला बाद केल्यानंतर ठराविक अंतराने आफ्रिकेचे फलंदाज माघारी परतत राहिले. आफ्रिकेचा एकही फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांना निर्धारीत षटकांत १४६ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून आदिल राशिदने २ तर आर्चर-करन आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवातही फारशी चांगली झाली. सलामीवीर जेसन रॉय चांगली सुरुवात केल्यानंतर लगेच बाद झाला. जोस बटलरही फारशी चमक दाखवू शकला नाही. यानंतर मैदानावर आलेल्या मलानने सावध खेळ करत संघाचा डाव सावरला. पहिल्या सामन्यात फटकेबाजी करणारा बेअरस्टोही शम्सीच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतल्यामुळे इंग्लंडच्या अडचणी वाढल्या. परंतू मलानने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने ४० चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५५ धावा केल्या. यानंतर कर्णधार मॉर्गनने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. आफ्रिकेकडून शम्सीने ३, एन्गिडीने २ तर रबाडाने १ बळी घेतला.