|| प्रशांत केणी

गेल्या १५ वर्षांमधील परदेशातील मैदानांवर सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ म्हणून मी सध्याच्या भारतीय संघाचा उल्लेख करीन, अशा शब्दांत नॉटिंगहॅमची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फुशारक्या मारल्या. अगदी मालिका गमावल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीनेही ‘‘होय, आमचा संघ सर्वोत्तम मानतो’’ असे छातीठोकपणे सांगितले. भारतीय क्रिकेटची गेल्या १५ वर्षांतील कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी या दोघांनीही नीट पाहिली नसावी. जी काही मर्दुमकी परदेशात भारताने दाखवली आहे, ती श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे यांसारख्या देशांमध्ये गाजवली आहे. त्यामुळेच शास्त्री यांच्या वल्गनेचे आता शल्यविच्छेदन होत आहे.

इंग्लंडविरुद्धची मालिका भारताने १-४ अशा मानहानीकारक पद्धतीने गमावली. यात तसे नवे काहीच नाही. इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय पानिपताची पुनरावृत्ती घडली इतकेच. भारतीय संघ इंग्लंडमध्ये ६२ कसोटी सामने खेळला आहे. यापैकी ३४ सामन्यांत पराभूत झाला आहे आणि या मालिकेत आतापर्यंतचा फक्त सातवा सामना जिंकता आला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच कोहलीच्या नेतृत्वावरही कडाडून टीका होत आहे. क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदल करण्यात कोहली अपयशी ठरल्याचे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीसुद्धा व्यक्त केले आहे.

कोहलीने फलंदाज म्हणून आपली भूमिका चोख पार पाडली. समोरच्या बाजूने आपले सहकारी फलंदाज हाराकिरी पत्करत असताना कोहलीने त्याची कोणतीही तमा बाळगली नाही. परंतु भारताच्या अन्य फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव दिसून आला. मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे कसोटी क्रिकेटसाठीचे खास फलंदाज पूर्णत: अपयशी ठरले. धावांसाठी झगडणाऱ्या विजयला दोन कसोटी सामन्यांत एकूण २६ धावा करता आल्या. पुजारा आणि रहाणे एखाद-दुसरा सामना खेळून गेले. तिसऱ्या कसोटीत अर्धशतक आणि चौथ्या कसोटीतील शतक हीच पुजाराची पुंजी. रहाणेने नॉटिंगहॅम कसोटी जिंकून देणारी ८१ धावांची खेळी साकारली, तर चौथ्या कसोटीत अर्धशतक नोंदवले. परंतु कसोटी क्रिकेटमधील झुंजार वृत्ती अंगीभूत असणाऱ्या या दोघांनाही अपेक्षांची पूर्तता करता आली नाही. वृद्धिमान साहाच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचे दिनेश कार्तिकला सोने करता आले नाही. मात्र ऋषभ पंतने यष्टिरक्षण आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये छाप पाडली.

भारताच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजांनी अधिक चांगली कामगिरी केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी टिच्चून गोलंदाजी करीत इंग्लिश फलंदाजांवर अंकुश ठेवला. मात्र ‘कपिल देव’चा वारसदार म्हटले जाणाऱ्या हार्दिक पंडय़ाचे अष्टपैलुत्व अपयशी ठरले. रविचंद्रन अश्विनला ‘जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज’ हा लौकिक दाखवता आला नाही. त्या तुलनेत मोईन अली आणि आदिल रशीद या इंग्लिश फिरकी गोलंदाजांनी अधिक चांगली गोलंदाजी केली.

परदेश दौऱ्यावरील कसोटी मालिकेपूर्वी भारताने तिथे सराव सामने खेळावेत, अशी सूचना माजी कर्णधार सौरव गांगुली गेली अनेक वष्रे देतो आहे. मात्र त्याच्या सल्ल्याचे गांभीर्य अद्याप कुणालाही वाटत नाही. भारताने किमान दोन सराव सामने खेळण्याची आवश्यकता होती. मात्र कार्यक्रमपत्रिकेतील एकमेव चार दिवसांचा सराव सामनासुद्धा तीन दिवसांचा करण्यात आला. याचप्रमाणे इंग्लंड दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर भारताचे प्रमुख खेळाडू इंग्लिश वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कौंटी खेळणार, अशी चर्चा होती. मात्र ते वास्तवात अवतरले नाही.

शास्त्री-कोहली द्वयीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असणाऱ्या भारतीय संघालाही इंग्लंडविरुद्धचा कसोटी क्रिकेटमधील इतिहास बदलता आला नाही. परंतु अपयशाने खचून जाण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

prashant.keni@expressindia.com