करोनानंतर नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने वेस्ट इंडिजला पराभूत करत कसोटी मालिका २-१ अशी खिशात घातली. त्यानंतर ३० जुलैपासून आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटलादेखील सुरूवात झाली. इंग्लंडने पहिल्या वन डे सामन्यात आयर्लंडवर ६ गडी राखून विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याचसोबत ICC Men’s Cricket World Cup Super League स्पर्धेत १० गुणांसह आपले खाते उघडले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डेव्हिड विलीने आयर्लंडला चांगलाच दणका देत 30 धावांत ५ बळी टिपले. आयर्लंडकडून कर्टीस कॅम्फरने (५९) अर्धशतक केले. तर सिमरनजीत सिंगने झुंजार ४० धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांनी फारसा प्रभाव पाडला नाही. त्यामुळे आयर्लंडचा डाव १७३ धावांत आटोपला.

१७४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ६ गडी राखून सामना जिंकला. विकेट्स राखून पार केले. जेसन रॉय (२४) आणि जेम्स विन्स (२५) चांगली सुरूवात मिळाल्यानंतर बाद झाले. त्यानंतर सॅम बिलिंग्सने नाबाद अर्धशतक (६७) ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने २७.५ षटकात सामना जिंकला आणि ICC Men’s Cricket World Cup Super League मध्ये आपले गुणांचे खाते उघडले.

काय आहे ICC Men’s Cricket World Cup Super League

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी (२७ जुलै) क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगची (ICC Cricket World Cup Super League) घोषणा केली. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ यांना विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळणार आहे.

ICCचे पूर्ण सदस्यत्व असलेले १२ संघ आणि वर्ल्ड क्रिकेट सुपर लीग २०१५-१७ चे विजेते नेदरलँड्स असे १३ संघ या नव्या सुपर लीगमध्ये स्पर्धेत खेळतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशात ४-४ वन डे मालिका खेळेल. प्रत्येक वन डे मालिका ही ३ सामन्यांचीच असेल. प्रत्येक सामना विजयाला १० गुण आणि सामना बरोबरीत किंवा अनिर्णित राहिल्यास ५ गुण मिळतील. या स्पर्धेत जो संघ थेट पात्र ठरणार नाही, त्याला क्वालिफायर २०२३ मध्ये पाच सहकारी संघासह खेळून आपले स्थान पक्के करावे लागेल. अशा प्रकारे दोन संघ निवडले जातील आणि भारतात १० संघांमध्ये मूळ विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल.