18 September 2020

News Flash

Eng vs Pak : बटलर-वोक्स जोडीचा पाकिस्तानला दणका, पहिल्या कसोटीत इंग्लंड विजयी

पाकिस्तानकडून यासिर शहा चमकला

जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी दुसऱ्या डावात केलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर यजमान इंग्लंडने मँचेस्टर कसोटीत पाकिस्तानवर ३ गडी राखून मात केली आहे. दुसऱ्या डावात विजयासाठी २७७ धावांचं आव्हान मिळालेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. परंतू मधल्या फळीत जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे चौथ्याच दिवशी सामन्याचा निकाल लागला. वोक्स आणि बटलर जोडीने झळकावलेली अर्धशतकं हे इंग्लंडच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.

पहिल्या डावात पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमणाचा अंदाज घेत इंग्लंडने दुसऱ्या डावात सावध सुरुवात केली. सलामीवीर रोरी बर्न्सला स्वस्तात माघारी धाडण्यात पाकिस्तानी गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर डोम सिबली आणि कर्णधार जो रुट यांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी केली. सिबलीला बाद करत यासिर शहराने पाकिस्तानला दुसरा महत्वाचा ब्रेक-थ्रू मिळवून दिला. यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी परत निराशा केली. अखेरीस चौथ्या दिवशी जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी धडाकेबाज खेळी करत पाकिस्तानच्या हातातून विजय हिसकावून घेतला. ११७-५ अशी परिस्थिती असताना बटलर आणि वोक्स जोडीने सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे पाकिस्तान सामन्यात बॅकफूटला ढकललं गेलं.

यासिर शहाने ७५ धावांवर बटलरला आणि त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडला माघारी धाडत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ख्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड जोडीने विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बटलरने १०१ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ७५ धावा केल्या. यानंतर ख्रिस वोक्सनेही मैदानात अखेरपर्यंत टिकून राहत नाबाद ८४ धावा काढत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावातही फिरकीपटू यासिर शहाने ४ बळी घेत आपली चमक दाखवली. मात्र मोक्याच्या क्षणी इंग्लंडची जोडी फोडण्यात अयशस्वी ठरल्यामुळे पाकिस्तानला हातात आलेल्या विजयाचा गमवावा लागला.

पहिल्या डावात शान मसूदच्या शतकी खेळीनंतर पाकिस्तानने ३२६ धावांचा डोंगर उभा केला. याचसोबत गोलंदाजीत यासिर शहा, मोहम्मह अब्बास आणि शादाब खान यांनी भेदक मारा करत इंग्लंडचा पहिला डाव २१९ धावांत गुंडाळला. दुसऱ्या डावात मात्र पाकिस्तानी फलंदाजांची घसरगुंडी उडाली. स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स यांनी आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत पाकिस्तानला मोठी आघाडी घेण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून यासिर शहाने फटकेबाजी करत सर्वाधिक ३३ धावा केल्या. याच खेळीच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या डावात १६९ धावांपर्यंत मजल मारत इंग्लंडला २७७ धावांचं आव्हान दिलं. परंतू मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानी गोलंदाजांना सामन्यात हार पत्करावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 11:02 pm

Web Title: england beat pakistan by 3 wickets woakes buttler played crucial inning psd 91
Next Stories
1 युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, साखरपुडा सोहळा संपन्न
2 मांजरीचं फिल्डींग स्किल पाहून सचिनही झाला अवाक, म्हणाला…ही तर जॉन्टी ऱ्होड्सलाही टक्कर देईल !
3 एलिस पेरी पुनरागमनासाठी सज्ज, चाहत्यांसाठी शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ
Just Now!
X