विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत बरोबरी साधण्यात अखेरीस यजमान इंग्लंडला यश आलं आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर इंग्लंडने अखेरच्या दिवशी विजय खेचून आणत वेस्ट इंडिजवर ११३ धावांनी मात केली. या विजयासह ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे. अखेरच्या दिवशी विंडीजला विजयासाठी ३१२ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. परंतू इंग्लंडच्या माऱ्यासमोर विंडीजचा डाव कोसळला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली.

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात बेन स्टोक्सने फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. स्टोक्सच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने आपला दुसरा डाव १२९ धावांवर घोषित करुन विंडीजला ३१२ धावांचं आव्हान दिलं. मात्र विंडीजची दुसऱ्या डावातली सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या ३७ धावांत विंडीजचे बिनीचे शिलेदार माघारी परतले. दुसऱ्या डावात ब्रुक्स, ब्लॅकवूड आणि कर्णधार जेसन होल्डर यांचा अपवाद वगळता एकही विंडीज फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. पहिल्या डावात चांगली कामगिरी करणारे क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस हे दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतले. ब्रुक्सने ६२ तर ब्लॅकवूडने ५५ धावांची खेळी केली. कर्णधार जेसन होल्डरनेही ३५ धावांची खेळी करत चांगली झुंज दिली.

अवश्य वाचा – Eng vs WI : इंग्लंडच्या कोणत्याही सलामीवीराला न जमलेली कामगिरी स्टोक्सने करुन दाखवली

मात्र इतर फलंदाजांचं अपयश विंडीजला चांगलंच भोवलं. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे विंडीजवरचं दडपण वाढत गेलं. अखेरीस विंडीजचा दुसरा डाव १९८ धावांवर संपवत इंग्लंडने सामन्यात विजय मिळवला. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने ३, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी २-२ तर करन आणि बेसने १-१ बळी घेतला. या मालिकेतला अखेरचा सामना २४ जुलैपासून ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून मालिकेत बाजी कोण मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.