तब्बल ४ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला. यजमान इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची अखेरचा कसोटी सामना २६९ धावांनी जिंकून ही कसोटी मालिका २-१ च्या फरकाने जिंकली आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन करत मालिकेत बाजी मारली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने या सामन्यात अष्टपैलू खेळी केली.

इंग्लंडने दुसऱ्या डावात विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान दिल्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस विंडीजची सुरुवात खराब झाली होती. दोन बळी गेल्यानंतर चौथ्या दिवशी संपूर्ण दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला. अखेरच्या दिवसात इंग्लंडच्या गोलंदाजांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. परंतू असं काहीही न घडता विंडीजच्या फलंदाजांना एका मागोमाग एक धक्के देत इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात शाई होप आणि शेमराह ब्रुक्स यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना थोडाफार सामना करण्याचा प्रयत्न केला. होपने ३१ तर ब्रुक्सने २२ धावा केल्या. मात्र त्यांची डाळही फारकाळ शिजू शकली नाही. त्याआधी दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत आपला कसोटी क्रिकेटमधला ५०० वा बळी घेतला. ब्रुक्स आणि होप माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ख्रिस वोक्सने भेदक मारा करत विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं. त्याला ब्रॉडनेही चांगली साथ दिली. अखेरच्या फळीत ब्लॅकवुडनेही फटकेबाजी करत इंग्लंडचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची डाळही इंग्लंडच्या गोलंदाजांनी शिजू दिली नाही. विंडीजचा दुसरा डाव १२९ धावांवर संपवून इंग्लंडने सामन्यात बाजी मारली.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ख्रिस वोक्सने ५ तर स्टुअर्ट ब्रॉडने ४ बळी घेतले.विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेनंतर इंग्लंड ३० जुलैपासून आयर्लंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. यानंतर इंग्लंडच्या घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळेल.