पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने ३ गडी राखत विजय संपादन केला. मात्र या सामन्यात संघाचा महत्वाचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रॉडने आयसीसीच्या Article 2.5 Level 1 नियमाचा भंग केला आहे. ज्यासाठी त्याच्या मानधनातली १५ टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. ब्रॉडने आक्रमक भाषेचा वापर करुन प्रतिस्पर्ध्याला चिथवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात ४६ व्या षटकादरम्यान स्टुअर्ट ब्रॉड आणि पाकिस्तानचा फलंदाज यासिर शहा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं. यावेळी ब्रॉडने यासिर शहाला उद्देशून आक्रमक भाषा वापरली. पंच रिचर्ड केटलबुरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ब्रॉडवर हा आरोप ठेवला. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत ब्रॉडने आपली चूक मान्य केली, ज्यामुळे त्याच्या मानधनातली १५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली. इतकच नव्हे तर ब्रॉडच्या खात्यात नियमांचा भंग केल्याप्रकरणी १ डिमेरीट पॉईंटही जमा झाला आहे.