इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांचा सवाल

लंडन : कसोटी मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारताच्या तयारीबाबत बरीच टीका होत असली तरी इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. भारतीय संघ अधिक सराव सामने खेळला असता तर ते पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अधिक तंदुरुस्त राहिले असते, हे मानणे योग्य नाही, असे बेलिस यांनी सांगितले.

इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या ०-२ असा पिछाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना शनिवारपासून नॉटिंगहॅम येथे सुरू होणार आहे. या पाश्र्वभूमीवर बेलिस म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांच्यासारख्या संघांचे क्रिकेटपटू बरेच सामने खेळतात, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक संघ अधिकाधिक सराव सामने खेळण्यास उत्सुक असतो. त्यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर आणखी ताण पडतो.खेळाडूंना विश्रांतीचीही आवश्यकता असते, याचा बहुदा विसर पडतो. काही खेळाडू सर्वच सामने खेळतात. त्यामुळे सराव सामन्यांची त्यात भर पाडणे योग्य ठरणार नाही.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेपूर्वी एकमेव सराव सामना खेळला होता. तो आधी चार दिवसांचा निश्चित करण्यात आला होता, परंतु नंतर तो तीन दिवसांचा केला गेला. मालिकेपूर्वी आणखी सराव सामन्यांची गरज होती, असे मत मांडत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली होती. इंग्लिश संघ जेव्हा परदेशात जातो, तेव्हासुद्धा याच पेचात पडतो, असे बेलिस यांनी प्रामाणिकपणे सांगितले.

बेअरस्टो-वोक्सला विजयाचे श्रेय!

इंग्लंड संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीबाबत बेलिस यांनी समाधान प्रकट केले. त्याचे विश्लेषणकरताना ते म्हणाले, ‘‘पहिली कसोटी रंगतदार झाली. दुसरी कसोटीसुद्धा तशीच होईल असे वाटत होते. मात्र जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स यांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनाच या विजयाचे श्रेय जाते. मग गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली.’’