पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आयपीएलच्या १४व्या पर्वात खेळलेल्या खेळाडूंना इंग्लंडने या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. दुखापतीमुळे बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर आधीच बाहेर पडले आहेत. तर जॉनी बेअरस्टो, मोईन अली, जोस बटलर, सॅम करन आणि ख्रिस वोक्स यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत होते. या खेळाडूंना आता आराम मिळाला आहे.

इंग्लंडने या मालिकेसाठी फलंदाज जेम्स ब्राकी आणि वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनचा समावेश केला आहे. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ब्राकी आणि रॉबिन्सनने उत्कृष्ट कामगिरी बजावली. ब्राकीने ५३च्या सरासरीने ४७८ धावा केल्या आहेत, तर रॉबिनसनने २९ विकेट्स घेतल्या आहेत.

 

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २ ते ६ जून दरम्यान लॉर्ड्स येथे, तर दुसरा कसोटी बर्मिंगहॅम येथे १० ते १४ जून दरम्यान खेळला जाईल. संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड म्हणाले, “ब्राकी आणि रॉबिन्सन यांना कसोटी संघात प्रवेश करण्याचा हक्क आहे. या मोसमात या खेळाडूंनी काऊंटीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली.”

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडची संघ :

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जेम्स ब्राकी, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॅक क्रॉली, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, क्रेग ओव्हरटोन, ओली पोप, ओली रॉबिन्सन , डोम सिब्ली, ओली स्टोन आणि मार्क वूड.