इंग्लंडचा यशस्वी कर्णधार असे बिरुद मिरवणाऱ्या अ‍ॅलिस्टर कुकने नुकताच आपल्या पदाचा त्याग केला. एरवी बरेचजण कर्णधारपद म्हणजे नेतृत्वाची कला मानत असले तरी कुकच्या दृष्टीने हे पद म्हणजे त्याच्या कर्तव्याचा भाग होता. त्याच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत-

‘‘कर्णधारपद तुम्ही स्वत:च्या पद्धतीनुसार सांभाळायचे असते. तुम्ही कुणाचीही नक्कल करू शकत नाही. इतर कर्णधारांकडून तुम्ही बरेच काही शिकू शकता. पण तुम्ही जेव्हा नेतृत्व करता, त्या वेळी फक्त तुम्ही तुमच्या प्रवृत्तीनुसार त्याकडे पाहायचे असते. तुमचे व्यक्तिमत्त्व ही जबाबदारी सांभाळायला जसे तुम्हाला प्रेरक ठरेल, त्याच प्रकारे ते तुम्ही निभावू शकता,’’ अशी इंग्लंडच्या अ‍ॅलिस्टर कुकने नेतृत्वाबाबत व्याख्या केली होती. मात्र तो फक्त शेखी मिरवण्याइतपत मर्यादित राहिला नाही, तर त्याने ते प्रत्यक्षात करूनही दाखवले. भारतात झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने ०-४  अशा पद्धतीने मानहानीकारक पराभव पत्करला आणि त्यानंतर त्याचे निमित्त ठरून कुकने कर्णधारपदाचा त्याग केला. त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडायची आवश्यकता होती का, अशी उलटसुलट चर्चा झाली.

अ‍ॅलिस्टर बेडफोर्ड शाळेत शिकत असताना त्याच्या वडिलांनी त्याला माइक ब्रेअरली यांचे ‘द आर्ट ऑफ कॅप्टन्सी’ (नेतृत्वाची कला) हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. मात्र हे पुस्तक आपण कधीच वाचले नसल्याची कबुली त्याने बारा वर्षांनंतर दिली. वयाच्या २४व्या वर्षी आत्मचरित्राच्या प्रकाशानाप्रसंगी कुक म्हणाला, ‘‘बालपणी मला माझी फलंदाजी हीच महत्त्वाची वाटायची. या वाटेत अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट मला अजिबात आवडायची नाही.’’

नेतृत्वक्षमता उपजतच असते, असे म्हणतात. कुकच्या कारकीर्दीचे विश्लेषण केल्यास त्याने ५९ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व केले. ‘क्रिकेटचे जन्मदाते’ असे बिरुद मिरवणाऱ्या या देशातील कोणत्याही खेळाडूने इतक्या सामन्यांत नेतृत्व केलेले नाही, असे इतिहास सांगतो. मात्र नेतृत्व ही कला नसून, एक प्रकारचे कर्तव्य आहे आणि त्यामुळेच मला ते आवडते. पण मला त्याची कधीच भुरळ पडली नाही, असे कुकने आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने २००७मध्ये कुकची ब्रेअर्ली यांच्याशी भेट घालून दिली. ब्रेअर्ली आपल्या कसोटी कारकीर्दीत ३९ सामने खेळले, यापैकी ३१ सामन्यांत त्यांनी देशाचे नेतृत्व केले. यापैकी १७ सामने इंग्लंड जिंकला, तर चार सामने हरला. विजयी संघनायक अशी ओळख निर्माण करणाऱ्या ब्रेअर्ली यांनी निवृत्तीनंतर लेखक आणि मानसतज्ज्ञ म्हणून कार्य सुरू केले. इतकेच नव्हे तर ब्रिटिश मानसशास्त्र संस्थेचे ते २००८ ते २०१० या कालावधीत अध्यक्षसुद्धा होते. त्यामुळे ब्रेअर्ली यांच्या विचारधारेला इंग्लिश क्रिकेटविश्वात मान होता.

या भेटीत ब्रेअर्ली आणि कुक यांनी तीन तास चर्चा केली. या चर्चेनंतर कुकने नेतृत्वाची एक दिशा ठरवली – ‘‘तुम्ही नेतृत्व करताना जितके शक्य होतील, तितक्या व्यक्तींचे सल्ले घ्या. बऱ्याच जणांशी बोला. मात्र अखेरीस कोणताही निर्णय घेताना किंवा प्रक्रिया राबवताना तुमच्या पद्धतीनेच ती करा. ’’

कुकच्या याच धोरणामुळे कर्णधारपदाची जटिल जबाबदारी मग अधिक सोपी झाली. परंतु तरीही आपली फलंदाजी हीच अधिक महत्त्वाची असल्याचे त्याला आजही वाटते. २००४ मध्ये युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकासाठी कुकला नेतृत्वाची संधी मिळाली. तेव्हा आपल्या फलंदाजीच्या उत्तम प्रयत्नांनीच संघाला विजय मिळवून देता येईल, अशी त्याची धारणा होती. या स्पध्रेअखेरीस इंग्लंडकडून सर्वाधिक एकंदर धावा अर्थातच कुकच्या नावावर होत्या.

२०१० मध्ये अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसने बांगलादेश दौऱ्यावरून माघार घेतल्यामुळे कुककडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले. नेतृत्वाच्या पहिल्याच डावात त्याने १७३ धावांची अप्रतिम खेळी साकारली. इंग्लंडने ५९९ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव २९६ धावांत संपुष्टात आल्यामुळे इंग्लंडकडे ३०३ धावांची आघाडी जमा झाली. मात्र तरीही कुकने बांगलादेशला फॉलोऑन लादण्याऐवजी दुसऱ्या डावातील फलंदाजीला प्राधान्य दिले. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत कुकने आणखी एक शतक (१०९) झळकावले. पुढील वर्षी प्रकाशित झालेल्या विस्डेन मासिकाने कुकबाबत असे भाष्य केले की, ‘‘इंग्लंडचा भावी कर्णधार ही प्रतिष्ठा त्याला सोयीसाठी सहजपणे बहाल करण्यात आली आहे.’’

कुकच्या फलंदाजीत बऱ्याचदा निर्णयाच्या घोषणेपलीकडले खूप काही असायचे. तो संपूर्ण दिवस खेळून काढायचा, तर बाकी प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक फलंदाजीची संधी द्यायचा. याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुरू असताना जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ग्रॅमी स्वान या अनुभवी गोलंदाजांशी तो रणनीती आणि क्षेत्ररक्षणाची रचना याबाबत सल्लामसलत करायचा.

२०१२ मध्ये स्ट्रॉसच्या निवृत्तीनंतर भारत दौऱ्यासाठी कर्णधारपदाची धुरा कुककडे सोपवण्यात आली. याला कारणही तसेच होते. भारताविरुद्धची त्याची कामगिरी उत्तम होती. भारत भूमीवरील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडचा डाव फक्त १९१ धावांत आटोपला आणि त्यांना फॉलोऑनची नामुष्की ओढवली. भारत दौऱ्यासाठी इंग्लिश संघाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाऊन खास तयारी केली होती. त्याचे फायदे दुसऱ्या डावात दिसून आले. कुकने तब्बल नऊ तास खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी केली आणि १७६ धावा केल्या. इंग्लिश संघ आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याने सिद्ध करून दाखवले की, इंग्लंडचा फलंदाज फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी करू शकतो. माझ्या कारकीर्दीतील एक सर्वोत्तम खेळी, असे इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहम गुचने या खेळीला गौरवले. नेतृत्वाचे हे यश फलंदाजीत परावर्तित होताना दिसत होते. मुंबईमधील दुसऱ्या कसोटीत दुसरे आणि कोलकाताच्या तिसऱ्या कसोटीत तिसरे शतक त्याने साकारले. भारतीय भूमीवर २-१ असा ऐतिहासिक कसोटी विजय मिळवणारी ती मालिका ठरली. तर कुकच्या खात्यावर एकंदर ५०६ धावा जमा होत्या. त्याने या मालिकेत एकूण २४ तास फलंदाजी केली. त्यामुळे मालिकावीर पुरस्कार अर्थातच कुकला देण्यात आला. केव्हिन पीटरसनची पाठराखण कुकनेच केली होती. मुंबई कसोटीत पीटरसनच्याच १८६ धावा उपयुक्त ठरल्या होत्या. नागपूरमध्ये जोनाथन ट्रॉट आणि इयान बेल यांनी शतके झळकावली. स्वान, अँडरसन आणि माँटी पनेसान यांच्या गोलंदाजीमुळे २८ वर्षांनंतर हे यश इंग्लंडला मिळू शकले. इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील एक सुवर्णाध्याय आणि कुकच्या नेतृत्वक्षमतेवर शिक्कामोर्तब नेमके याच वेळी झाले.

भारतानंतर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-० असा मालिका विजय मिळवला. अ‍ॅशेसमधील हा विजय कुकच्या नेतृत्वाच्या कारकीर्दीत महत्त्वाचा ठरला. मायकेल क्लार्क आणि कुकच्या नेतृत्वाची तुलना केल्यास क्लार्ककडे अधिक गुण होते. या वेळी कुकच्या फलंदाजीचा फॉर्म चांगला नव्हता. परंतु संघातील अनुभवी खेळाडूंनी फलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली. इयान बेलने तीन कसोटी सामन्यांत शतके साकारली. अँडरसन आणि ब्रॉड यांनी गोलंदाजीत चमक दाखवली. स्वानच्या खात्यावर २६ बळी जमा होते. कुकच्या नेतृत्वक्षमतेचे या वेळी मात्र ‘विस्डेन’ने मुक्तकंठाने कौतुक केले. ओव्हलच्या याच ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेटला काळिमा फासणारी घटना घडली होती. मैदानावर मद्यधुंद पार्टी करणाऱ्या काही खेळाडूंनी खेळपट्टीवर मूत्रविसर्जन केले. मात्र या घटनेत कुठेही कुकचे व्यक्तिमत्त्व डागाळले नाही. मग २०१५ मध्ये कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने आणखी एक अ‍ॅशेस मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा मालिका विजय हे त्याच्या कारकीर्दीतील आणखी एक मानाचे पान.

गेली साडेचार वष्रे कुकने ५९ सामन्यांत देशाचे नेतृत्व केले. यापैकी २४ विजय आणि २२ पराभव ही संघाची कामगिरी होती. त्याने सात विविध देशांमधील १७ मालिकांमध्ये नेतृत्व केले. यापैकी आठ मालिका इंग्लंडने जिंकल्या, तर चार गमावल्या. या कारकीर्दीतील काही पराभव त्याच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह करणारे ठरले. काही खेळाडूंनी निवृत्ती पत्करली, प्रशिक्षक आले आणि गेले. मात्र कुकने अढळपणे देशाची सेवा केली. इंग्लंडचे अनेक कर्णधार जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारे ठरले. मात्र कुकचे नाव या सर्वामध्ये अग्रेसर ठरते. त्यांच्या नेतृत्वकलेचे भलेही क्रिकेटजगतामध्ये गोडवे गायले गेले जातात, मात्र नेतृत्वाचे कर्तव्य यथोचित पार पाडणारा आणि योग्य वेळी आपले सिंहासन रिक्त करणारा हा कुक म्हणूनच वेगळा ठरतो. ‘‘कर्णधारपद सोडणे हा माझ्यासाठी अतिशय कठीण निर्णय होता. मात्र माझ्याकरिता आणि संघाकरिता तो योग्य निर्णय, योग्य वेळी घेतलेला आहे,’’ ही कुकची कर्णधारपदाचा त्याग करतानाची प्रतिक्रिया त्याच्या भावनिक तयारीची आणि देशाप्रति निष्ठेची साक्ष देते.
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com